वुसी सिबांडाची चमक

By admin | Published: March 9, 2016 05:16 AM2016-03-09T05:16:40+5:302016-03-09T05:16:40+5:30

सलामीवीर वुसी सिबांडाचे (५९ धावा, ४६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतक आणि एल्टन चिगंबुराने ठोकलेल्या झटपट ३० धावांच्या खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेने

Wuxi Sibanda's Shine | वुसी सिबांडाची चमक

वुसी सिबांडाची चमक

Next

किशोर बागडे,  नागपूर
सलामीवीर वुसी सिबांडाचे (५९ धावा, ४६ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतक आणि एल्टन चिगंबुराने ठोकलेल्या झटपट ३० धावांच्या खेळीनंतर शिस्तबद्ध गोलंंदाजीच्या बळावर झिम्बाब्वेने तुलनेत अनुभवहीन असलेल्या हाँगकाँग संघाचा टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या पात्रता लढतीत मंगळवारी १४ धावांनी पराभव केला.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेच्या २० षटकांतील ८ बाद १५८ धावांना प्रत्युत्तर देणाऱ्या हाँगकाँगला अखेरच्या २ षटकांत ३० धावांची गरज होती. त्यांचे ६ फलंदाज शिल्लक होते; पण चतारा आणि तिरिपानो यांच्या गोलंदाजीपुढे त्यांचा डाव ६ बाद १४४ असा मर्यादित राहिला. सलामीवीर जेमी अटकिन्सनची झुंज एकाकी ठरली. त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह सर्वाधिक ५३ धावांचे योगदान दिले. कर्णधार तन्वीर अफझलने १२ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह नाबाद ३१ धावा ठोकल्या; पण संघाचा पराभव त्याला टाळता आला नाही. मार्क चापमन याने १९ आणि अंशुमन रथ याने १३ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून डोनाल्ड तिरिपानो आणि तेंदई चतारा यांनी प्रत्येकी २ तसेच मस्कद्जा व रझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्याआधी, युवा हाँगकाँगने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. झिम्बाब्वेचा कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा आणि सिबांडा यांनी डावाला सुरुवात केली; पण मस्कद्जा (२०) तिसऱ्याच षटकात धावबाद झाला. मुतुम्बामीला भोपळाही फोडता आला नाही. हाँगकाँगचा कर्णधार तन्वीर अफझलने त्याला नदीम अहमदकरवी झेलबाद केले. तन्वीरनेच सीन विल्यम्स (१२) याची दांडी गुल करून दुसरा बळी घेतला. सिकंदर रझा (३) धावबाद होताच ८ षटकांत ४ बाद ६२ अशी स्थिती होती.
सिबांडाने मात्र एक बाजू सांभाळून पाचव्या गड्यासाठी माल्कम वॉलरसोबत ६१ धावांची भागीदारी करीत डावाला आकार दिला. दरम्यान, सिबांडाने ४० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह अर्धशतकपूर्ण केले. १७व्या षटकांत पहिल्या चेंडूवर वॉलर (२६) बाद झाला. आणखी दोन धावांची भर घालून याच षटकांत सिबांडाही (४६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा) झेलबाद होताच ६ बाद १२५ अशी झिम्बाब्वेची स्थिती झाली. एल्टन चिगंबुराने १३ चेंडूंत ३ षटकारांसह ३० धावा ठोकून झिम्बाब्वेला ८ बाद १५८ अशी मजल गाठून दिली. वुसी सिंबाडा सामन्याचा मानकरी ठरला.
> झिम्बाब्वे, हाँगकाँगच्या समर्थकांची हजेरी
पात्रता फेरीचा हा सामना पहण्यासाठी झिम्बाब्वे आणि हाँगकाँगच्या पाठीराख्यांनी आपापल्या राष्ट्रध्वजांसह स्टेडियममध्ये हजेरी लावली. यातील काही जण विशिष्ट पेहरावात आल्याने मैदानात उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. स्थानिक प्रेक्षकांनीदेखील तुरळक गर्दी करून दोन्ही संघांचा उत्साह वाढविला. यंदाच्या विश्वचषकात आयसीसीने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ढोलताशांची सोय केली आहे. स्टेडियमच्या आत पब्लिक डीमांडवर ढोल वाजत असल्याने अधूनमधून नृत्य करीत प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटताना दिसले.

Web Title: Wuxi Sibanda's Shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.