WWE बद्दल मोठी अपडेट! CEO चा तडकाफडकी राजीनामा; मालकी कोणाकडे अन् पुढे काय...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:18 AM2023-01-13T11:18:37+5:302023-01-13T11:19:20+5:30
WWE ही जगातील सर्वात मोठी प्रोफेशनल कुस्ती कंपनी
WWE wresting: अमेरिकेतील लोकप्रिय प्रोफेशनल रेसलिंग स्पर्धा असलेल्या WWE बद्दल एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की WWE ला सौदी अरेबियाच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंडने विकत घेतले आहे. स्टेफनी मॅकमोहन आणि विन्स मॅकमोहन यांनी या स्पर्धेच्या बोर्डावरील पदांचा राजीनामा दिला तेव्हापासून या प्रकारच्या चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत असे दिसून येत आहे.
DAZN pro च्या अहवालानुसार, विन्स आणि स्टेफनी यांच्याकडे WWE चे बहुतांश शेअर्स होते, जे आता विकले गेले आहेत. वडील-मुलगी या दोघांनी कंपनी सार्वजनिक शेअर बाजारातून काढून खाजगी व्यवसाय म्हणून पुढे नेली होती. त्यानंतर आता त्या शेअर्सची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. WWE ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कुस्ती कंपनी मानली जाते, जी १९९९ पासून जगातील विविध देशांमध्ये प्रसिद्ध आहे आणि लोकांचे मनोरंजन करत आहे. ही कंपनी मॅकमोहन कुटुंबाने तयार केली होती, पण नंतर ती सार्वजनिक करण्यात आली होती. त्यानंतर कंपनी विकण्यापूर्वी पुन्हा एकदा खाजगी करण्यात आली.
विन्स मॅकमोहन यांच्यावर काही आरोप झाले होते, त्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा परिस्थितीत त्यांची मुलगी स्टेफनी सर्व जबाबदारी सांभाळत होती, मात्र दोन दिवसांपूर्वीच सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. ती WWE च्या Co-CEO पदावर होती. तथापि, स्टेफनीचा पती आणि स्टार रेसलर ट्रिपल-H अजूनही कंपनीशी संबंधित राहणार आहे, असे सांगितलं जात आहे. WWE भारतात देखील खूप लोकप्रिय आहे. शेकडो देशांमध्ये हे प्रसारित केले जाते. भारतातील अनेक स्टार्स देखील आहेत यात सहभागी होताना दिसतात.