यासिन मर्चंटची विजयी आगेकूच
By admin | Published: March 16, 2017 03:39 AM2017-03-16T03:39:52+5:302017-03-16T03:39:52+5:30
बलाढ्य यासिन मर्चंट याने हँडिकॅप +३ गुणांसह खेळताना रोहन साकळकरचा ३-१ असा पराभव करुन ९ - रेड खुल्या हँडिकॅप स्नूकर स्पर्धेत विजयी कूच केली
मुंबई : बलाढ्य यासिन मर्चंट याने हँडिकॅप +३ गुणांसह खेळताना रोहन साकळकरचा ३-१ असा पराभव करुन ९ - रेड खुल्या हँडिकॅप स्नूकर स्पर्धेत विजयी कूच केली. त्याचवेळी, अन्य सामन्यात कसलेल्या व अनुभवी सिध्दार्थ पारिखला चांगल्या सुरुवातीनंतरही रेयान रझमीविरुध्द २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.
माटुंगा जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दोन वेळचा आशियाई स्नूकर विजेत्या यासिनने आपल्या लौकिकानुसार अचूक स्ट्रोक्सचे प्रदर्शन करताना रोहनचा ५०-४१, १३-४६, ५२-३३, ५९(३३)-४१ असा पराभव केला. दुसऱ्या फ्रेममध्ये रोहनने वरचढ ठरताना यासिनला झुंजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, यानंतर यासिनने सलग दोन फ्रेम जिंकताना सहज बाजी मारली.
त्याचवेळी, अनुभवी सिध्दार्थच्या पराभवाने स्पर्धेत खळबळ माजली. सिध्दार्थनेही हँडिकॅप +३ गुणांसह खेळताना चांगली सुरुवात केली. सुरुवातीचे दोन फ्रेम जिंकून त्याने २-० अशी दमदार आघाडीही घेतली होती. परंतु, यानंतर रेयानने जबरदस्त पुनरागमन करताना सलग तीन फ्रेम जिंकताना २४-६८(४४), २५-६९, ५९-४८, ५२-३, ४६-० अशी बाजी मारली.
त्याचप्रमाणे अनिश झवेरी, शैलेश राव आणि मानव पांचाळ यांनीही आपआपल्या सामन्यात बाजी निर्णयाक विजयाची नोंद करताना स्पर्धेत विजयी आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)