यंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 09:51 IST2018-08-17T03:52:26+5:302018-08-17T09:51:40+5:30
भारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल.

यंदाही तिरंगा नक्की फडकावणार - वीरधवल खाडे
- अभिजीत देशमुख
भारतात जलतरणाला जरी एवढे महत्त्व दिले जात नसले, तरी माझा व संघातील प्रत्येक जलतरणपटूचा पदक जिंकून स्पर्धेत तिरंगा फडकावून आपले राष्ट्रगीत वाजविण्याचा प्रयत्न असेल. २०१० आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर २०१४च्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक होतो. परंतु काही कारणास्तव सहभागी होऊ शकलो नाही,’ असे देशाचा अव्वल जलतरणपटू वीरधवल खाडेने लोकमतला सांगितले.
मी या स्पर्धेसाठी सप्टेंबर २०१७पासून तयारी करीत आहे. राष्ट्रकुल आणि काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये समाधानकारक परिणाम आले. या स्पर्धेसाठी मी खास शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यावर भर दिला आहे. मी या स्पर्धेत ५०, १०० मीटर व ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभाग घेत आहे. २१ आॅगस्टला होणाऱ्या ५० मीटर फ्रीस्टाईल स्पर्धेत पदक नक्की जिंकेन, असा आत्मविश्वास आहे. चीन, जापान यांचे आव्हान तर आहेच; तसेच आॅलिम्पिक सुवर्ण विजेता जोसेफ सकुलींगमुळे सिंगापूर संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाचा उत्तम सराव झाला आहे. रिले स्पर्धेसाठीसुद्धा आम्ही उत्सुक आहोत. आमचा प्रयत्न २-३ पदके जिंकून भारतीय जलतरणामध्ये क्रांती घडविण्याचा आहे.
जकार्ता आशियाई क्रीडा साठी सज्ज
१८ आॅगस्टपासून सुरू होणा-या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जकार्ता सज्ज दिसत आहे. सुराबया जंगलातील आग, सुमात्रामध्ये आतंकवादी हमला, लुम्बार्क येथे भूकंप, आर्थिक तंगी अशा सगळ्या संकटांवर मात करून इंडोनेशिया आपली मान उंचावण्यासाठी आयोजन करण्यास सर्वस्व देत आहे. ४५ देशांचे १६,००० पेक्षा जास्त खेळाडू स्पर्धेत सहभाग असल्याने आॅलिम्पिकनंतर सर्वात मोठी बहुक्रीडा स्पर्धा म्हणून बघिलते जात आहे. आशियाई क्रीडाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन शहरे जकार्ता आणि पालेमबंग मिळून या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. या दोन्ही शहरांनी २०११ची दक्षिण-पूर्व आशियाई स्पर्धा आयोजित केली होती; त्यामुळे नवीन स्टेडियम करण्याची गरज पडली नाही. नूतनीकरणावर आयोजकांनी भर दिला आहे. केवळ सायकलिंग वेलोड्रोम (ट्रॅक प्रकार)साठी नवीन स्टेडियम बांधण्यात आले आहे.