यंदा फुटसाल अधिक यशस्वी होईल - रोनाल्डिन्हो
By admin | Published: July 15, 2017 04:38 AM2017-07-15T04:38:33+5:302017-07-15T04:38:33+5:30
‘फुटसालची जगभरात मोठी क्रेझ आहे. गेल्या वर्षी भारतातही या खेळाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘फुटसालची जगभरात मोठी क्रेझ आहे. गेल्या वर्षी भारतातही या खेळाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. यंदा प्रीमियर फुटसालचे दुसरे सत्र अधिक यश मिळवेल,’ असा विश्वास ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याने व्यक्त केला.
मुंबईत शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये प्रीमियर फुटसाल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची घोषणा रोनाल्डिन्होच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. २००५ साली बेलोन डिओर पुरस्कार पटकावलेल्या रोनाल्डिन्होने सांगितले की, ‘भारतात येऊन मी खूश आहे. फुटसालचे पहिला सत्र जबरदस्त यशस्वी ठरले आणि यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळेच यंदाचे दुसरे सत्र अधिक यशस्वी होईल, असा विश्वास आहे. भारतीयांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे मी खूप खूश आहे.’
त्याचबरोबर, ‘फिफा रँकिंगमध्ये भारताच्या सुधारलेल्या स्थानामुळे फुटसालला अधिक मदत मिळेल. खास करुन गतवर्षी मिळालेल्या यशामुळे यावेळी आणखी प्रगती होईल. यामुळे इतर खेळानांही मदत होईल,’ असेही रोनाल्डिन्होने म्हटले. दरम्यान, यावेळी प्रीमियर फुटसाल लीगने रोनाल्डिन्होसह तीन वर्षांचा करार केल्याची घोषणाही केली. यंदाच्या सत्रातील साखळी सामने भारतात रंगणार असून उपांत्य व अंतिम सामना दुबईला खेळविण्यात येतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.