यंदाच्या आयपीएलवर दुखापतीचे सावट
By admin | Published: April 1, 2017 01:09 AM2017-04-01T01:09:07+5:302017-04-01T01:09:07+5:30
भारताचा प्रमुख आॅफ स्पिनर आश्विनला पुन्हा एकदा हर्नियाचा त्रास उद््भवला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या
नवी दिल्ली : भारताचा प्रमुख आॅफ स्पिनर आश्विनला पुन्हा एकदा हर्नियाचा त्रास उद््भवला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वातून आश्विनने माघार घेतली आहे. आश्विन आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपरजायन्ट््स संघातून खेळतो. अनेक भारतीय खेळाडू व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमानंतर आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे चित्र आहे.
सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) आणि मुरली विजय (किंग्स इलेव्हन पंजाब) या दोघांना खांद्याच्या दुखापतीने सतावले आहे. ते या स्पर्धेत खेळू शकणार नाही. कर्णधार विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) व वेगवान गोलंदाज उमेश यादव (कोलकाता नाईट रायडर्स) आपापल्या फ्रॅन्चायझींकडून सुरुवातीचे काही सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय संघाचा क्रिकेटच्या सर्वंच प्रकारात महत्त्वाचा सदस्य असलेला आश्विन १ जूनपासून प्रारंभ होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेपूर्वी तंदुरस्त होईल, अशी आशा आहे. ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूने यंदाच्या मोसमात मायदेशात खेळल्या गेलेल्या सर्व १३ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले. त्याने जवळजवळ ७५० षटके गोलंदाजी केली. त्याने यंदाच्या मोसमात ८१ बळी घेतले.
आरसीबीचे नेतृत्व ए. बी. डिव्हिलियर्सकडे
बेंगळुरु : विराट कोहलीच्या खांद्याची दुखापत बरी न झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे नेतृत्व करेल. खांदेदुखीमुळेच फलंदाज लोकेश राहुल हा देखील खेळणार नाही. तो सर्जरीसाठी लंडनला रवाना होणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्याच्या पहिल्या कसोटीत लोकेशला दुखापत झाली होती. पण दुखणे सांभाळून तो खेळत राहिला.
विराटबाबत आरसीबीचे कोच डॅनियल व्हेट्टोरी म्हणाले, ‘सध्यातरी विराटच्या खेळण्याबद्दल स्पष्टता नाही. विराट बाहेर झाल्यास डिव्हिलियर्स नेतृत्व करेल. कोहली २ एप्रिलला संघात सहभागी होणार असून बीसीसीआयच्या फिजिओकडून त्याची उपलब्धता निश्चित होणार आहे.’
विराट आणि राहुलच्या अनुपस्थितीत सर्फराज खान याला सुरुवातीच्या सामन्यात संधी मिळू शकते. याशिवाय राखीव बाकावर काही प्रतिभावान खेळाडू असल्याची माहिती देत व्हेट्टोरी पुढे म्हणाले, ‘मनदीपसिंग हा चांगला फलंदाज आहे. जवळपास १५ सामने खेळायचे असल्याने खेळाडूंना विश्रांती मिळण्याच्या हेतूने आम्ही वेळापत्रक तयार करीत आहोत. सर्वांना संधी मिळावी असा यामागील विचार आहे.