National Sports Day: यंदाचा क्रीडादिन मैदानावर नाही, तर कॉम्प्युटर-मोबाइलवर होणार साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 01:30 IST2020-08-29T01:28:42+5:302020-08-29T01:30:04+5:30
कोरोनाचा परिणाम : शालेय, महाविद्यालयीन स्पर्धांना प्रतीक्षा सरकारच्या परवानगीची; हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिन

National Sports Day: यंदाचा क्रीडादिन मैदानावर नाही, तर कॉम्प्युटर-मोबाइलवर होणार साजरा
मुंबई : ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळख असलेले दिग्गज खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडादिन यंदा आॅनलाइन स्वरूपात साजरा होत आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट असून प्रत्येक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला. दरवर्षी क्रीडादिनी केंद्र सरकारच्या वतीने होणारा राष्ट्रीय पुरस्कार सोहळाही आॅनलाइन पद्धतीने होईल. मुंबईतही यंदा आॅनलाइन पद्धतीनेच क्रीडादिन साजरा करण्यात येत आहे.कोरोनामुळे सर्व शाळा सध्या बंद असून अभ्यासक्रम आॅनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र याचा फटका बसला तो शारीरिक शिक्षण विभागाला. खेळांवरही निर्बंध आल्याने विद्यार्थ्यांना मैदानावर घाम गाळता येत नाही. त्यातच यंदाचा क्रीडादिनही आॅनलाइन पद्धतीने साजरा करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीही आहे.
याबाबत मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘सध्याच्या परिस्थितीमध्ये गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाचा क्रीडादिन मोजक्या अधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होईल. मुंबई परिसरातील सर्व शाळांना आॅनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’
सरकारकडून मिळणाºया निर्देशानुसारच क्रीडा उपक्रमांची सुरुवात होईल, अशी माहिती देत फरताडे म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारकडून जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार नाही. सध्या टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्यात येत असून त्यानुसार शालेय स्पर्धांचा विचार होईल. ज्या खेळांमध्ये शारीरिक संपर्काचा फारसा संबंध येत नाही, अशा खेळांसाठी सरकारकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी सामाजिक अंतराचे पालन करून थोडा वेळ तरी आपल्या घराच्या परिसरात खेळावे,’ असेही फरताडे यांनी सांगितले. दुसरीकडे, महाविद्यालयीन स्तरावरही खेळ बंद असून मुंबई विद्यापीठाद्वारेही आॅनलाइन पद्धतीनेच क्रीडादिन साजरा होईल.
कोरोनामुळे अद्याप भारतीय विद्यापीठ संघटनेकडून (एआययू) कोणतेही वेळापत्रक जाहीर न झाल्याने मुंबई विद्यापीठाचेही वेळापत्रक ठरलेले नाही. याबाबत मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहन आमृळे यांनी सांगितले की, ‘कोरोनामुळे यंदाचे वेळापत्रक ठरलेले नाही. वरिष्ठ पातळीवरच नियोजन झालेले नसल्याने विद्यापीठ स्तरावरील उपक्रमाबाबतही निर्णय झालेले नाहीत. कोरोनामुळे केवळ खेळडूंचेच नुकसान झाले नसून सर्वसामान्यांनाही त्याचा फटका बसला आहे. कारण, सर्वांच्याच शारीरिक हालचालींवर निर्बंध आले आहेत.’ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा मैदानावर येण्याची उत्सुकता आहे. याबाबत आमृळे म्हणाले, ‘सर्वप्रथम आरोग्य महत्त्वाचे आहे. स्पर्धा आणि पदक हे दुय्यम स्थानी आहे. त्यामुळे सध्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले गेले पाहिजे. स्पर्धा आयोजनाची घाई केली आणि काही अनुचित प्रकार घडला तर ते खूप महागात पडेल. बॅडमिंटन, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस यांसारख्या काही खेळांचा अपवाद सोडल्यास बाकी सगळे खेळ शारीरिक संपर्काचे आहेत. त्यामुळे घाई न करता सरकारच्या निर्देशांनुसार काम करावे लागेल.’
‘फिट इंडिया फ्रीडम रन’ सर्वांसाठी
क्रीडादिनानिमित्त केंद्र सरकारची मोहीम असलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ या व्हर्च्युअल रनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत फरताडे यांनी सांगितले की, ‘२ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणाºया या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात. यामध्ये सहभागी धावपटू आपल्या पसंतीच्या ठिकाणी दिलेले अंतर धावत अथवा चालत पूर्ण करू शकतात. या उपक्रमात सहभागी होणाºया सर्वांना आॅनलाइन प्रमाणपत्र देण्यात येईल. शारीरिक तंदुरुस्ती राखण्याच्या उद्देशाने जास्तीतजास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.’