येलेना ओस्टापेंको फ्रेंच ओपन सम्राज्ञी
By admin | Published: June 11, 2017 12:31 AM2017-06-11T00:31:17+5:302017-06-11T00:31:17+5:30
लाटव्हियाची बिगरमानांकित येलेना ओस्टापेंको हिने वेगवान सर्व्हिसचा अप्रतिम नमुना सादर करीत शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिला
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 11 - लाटव्हियाची बिगरमानांकित येलेना ओस्टापेंको हिने वेगवान सर्व्हिसचा अप्रतिम नमुना सादर करीत शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिला सेट गमविल्यानंतरही शानदार मुसंडी मारून तिसरी मानांकित सिमोना हालेपवर विजय नोंदवित फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले.
२० वर्षांच्या येलेनाने तीव्र संघर्षात सिमोनावर ४-६, ६-४, ६-३ ने सरशी साधली. फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली बिगरमानांकित तसेच सर्वांत कमी रँकिंग असलेली खेळाडू बनली आहे. तिचे हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम ठरले. इतकेच नव्हे तर इव्हा माजोलीनंतर(१९९७)ती सर्वांत कमी वयाची फ्रेंच ओपनची विजेती ठरली. याशिवाय पदार्पणात ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मानही गुस्ताव कुएर्तन नंतर ओस्टोपेंकोला मिळालाआहे. कुएर्तनने १९९७ साली रोलॅन्ड गॅरोस कोर्टवर अशीच कमाल केली होती.
हालेप ही लिली ततासे आणि व्हर्जिनिया रुजिसी पाठोपाठ ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी रोमानियाची तिसरी खेळाडू बनण्यापासून वंचित राहिली. चार वर्षांत दुसऱ्यांदा तिला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २५ वर्षांची हालेप विजेती ठरली असती तर एंजिलिक कर्बेरऐवजी ती विश्व क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू देखील बनली असती.