मुंबईकर योगेश देसाई यांची टेबल टेनिस क्रमवारीत छाप; अव्वल ४० खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 11:41 PM2020-01-12T23:41:53+5:302020-01-12T23:42:05+5:30
गेली ५४ वर्षे सातत्याने स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत असलेल्या देसाई यांनी कनिष्ट आणि वरिष्ठ पुरुष स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्त्व केले आहे.
मुंबई : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने (आयटीटीएफ) जाहीर केलेल्या आपल्या ताज्या क्रमवारीत भारताच्या योगेश देसाई यांना ६५ वर्षे गटात सातवे स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे वयस्कर (वेटरन्स) खेळाडूंच्या यादीत देसाई सर्वोत्तम भारतीय खेळाडू ठरले.
मुळचे मुंबईकर असलेले देसाई यांना दोहा येथे झालेल्या डब्ल्यूव्हीटी स्पर्धेत एकेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र याच स्पर्धेत दुहेरी गटात त्यांनी सुवर्ण पदकावर कब्जा केला होता. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी क्रमवारीमध्ये ३७ वरुन थेट ७व्या स्थानी झेप घेतली. देसाई हे आपल्या वयोगटात अव्वल ४० स्थानांमध्ये असलेले एकमेव भारतीयही ठरले आहेत. या वयोगटात ली युक्सियांग (अमेरिका), अब्दिल्ला जॉर्ज (आॅस्टेÑलिया) आणि झाई जियांगो (चीन) हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसºया स्थानी आहेत.
गेली ५४ वर्षे सातत्याने स्पर्धात्मक टेबल टेनिस खेळत असलेल्या देसाई यांनी कनिष्ट आणि वरिष्ठ पुरुष स्तरावर गुजरातचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यानंतर १९८५ साली मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईकडून खेळताना ४८ व्या वर्षांपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली. चारवेळचे वयस्कर खेळाडू विभागात राष्ट्रीय विजेते असलेल्या देसाई यांनी ५०, ६० आणि ६५ वयोगटात आपला दबदबा निर्माण करताना गेल्या १५ वर्षांत ३० हून अधिक पदके मिळवली.
यासह अधिकाधिक युवा खेळाडूंना या खेळाकडे वळविण्यासाठी टेबल टेनिस खेळाच्या प्रसारासाठीही देसाई पुढाकार घेत आहेत. तब्बल सातवेळा जागतिक वयस्कर टेबल टेनिस स्पर्धेत सहभाग नोंदवलेले देसाई यंदाच्या जून महिन्यांत आठव्यांदा फ्रान्समध्ये या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करतील. २०१८ साली लास वेगास येथे झालेल्या जागतिक वयस्कर अजिंक्यपद टेटे स्पर्धेत देसाई यांनी भारतासाठी सांघिक रौप्य पदक जिंकले असून पटाया आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकावले आहे.