योगेश ढाणे ठरले आयर्न मॅन स्पर्धेचे मानकरी; १४ तास ५५ मिनिटांत पूर्ण केली स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:05 AM2019-12-12T02:05:25+5:302019-12-12T02:05:48+5:30
ठाणे : शासकीय अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात. शारीरिक कष्ट नसल्याने त्यापैकी बरेच जणांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा ...
ठाणे : शासकीय अधिकारी-कर्मचारी हे त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात. शारीरिक कष्ट नसल्याने त्यापैकी बरेच जणांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. व्यायामासाठी वेळ मिळत नसल्याची सबब पुढे केली जाते. परंतु, अन्न व औषध प्रशासनात राजपत्रित अधिकारी असलेले ठाणे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश ढाणे यांनी आॅस्ट्रेलियातील बसलटन येथे झालेल्या आयर्न मॅन १४०.६ ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करावयाची असताना ती १४ तास ५५ मिनिटे या विक्र मी वेळेत पूर्ण करून आयर्न मॅनचा किताब पटकावला. हा पुरस्कार मिळविणारे ते राज्यातील पहिलेच शासकीय अधिकारी ठरले असून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांपुढे नवा आदर्श रचला आहे.
आॅस्ट्रेलियातील बसलटन येथे होणारी ही जागतिक दर्जाची आयर्न मॅन १४०.६ स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक स्वरु पाची असते. यामध्ये ३.८ कि.मी. हे अंतर समुद्रातून पोहणे, १८० कि.मी. अंतर सायकलिंग व ४२.२ कि.मी.धावणे असे तीन प्रकाराचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांचा कालावधी दिला जातो. १ डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत भारतातर्फेसहभागी झालेल्या ढाणे यांनी विक्र मी वेळेत स्पर्धा पूर्ण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानाचा आयर्न मॅन हा किताब पटकावला आहे.
लहानपणापासूनच व्यायामाची आवड असल्याने त्यांनी आजदेखील हा छंद जोपासला आहे. यापूर्वी त्यांनी सातारा, पुणे, मुंबई,गोवा या ठिकाणी पार पडलेल्या २८अर्ध मॅरेथॉन पूर्ण केल्या असून २०१८ व २०१९ सालात त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसेच त्यांनी यापूर्वी मलेशिया व गोवा येथे पार पडलेल्या आयर्न मॅन ७०.३ या स्पर्धा विक्र मी वेळेत पूर्ण करून आयर्न मॅन किताब पटकवणारे ते पहिले राज्य शासकीय अधिकारी ठरले आहेत.
येथे केला सराव
आॅस्ट्रेलिया येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ढाणे यांनी जानेवारी महिन्यापासून सरावास आरंभ केल्यानंतर अवघ्या अकरा महिन्यात त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. यासाठी त्यांना हैद्राबाद येथील ट्रायथलॉन प्रशिक्षक सुनील मेनन यांचे मार्गदर्शन लाभले तर फ्रान्सचे साहाय्यक प्रशिक्षक हेंझ व सातारा येथील ओपन वॉटर स्विमिंगचे प्रशिक्षक सुधीर चोरगे व ओमकार ठेरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. ते ठाणे व सातारा येथे सराव करत होते. मात्र, पोहण्याचा सराव त्यांनी उरमोडी धरण व उरण येथील समुद्रात केला. सायकलिंगचा सराव कराड-नाईकबा (ढेबेवाडी) मार्गावर तर धावण्याचा सराव त्यांनी मुंबई व ठाणे येथे करत होते.
अशी झाली स्पर्धा
आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी एक तास ३१ मिनिटे १० सेंकदात समुद्रातील आॅस्ट्रेलियन एक्झिट प्रकारातील हे अंतर पूर्ण केले. त्यानंतर ट्राझिट- १ साठी १० मिनिटे ५२ सेकंद वेळ लागला तर अत्यंत वारा असलेल्या खडतर मार्गावरून सायकलिंग करून १८० कि.मी.अंतर त्यांनी सहा तास ५० मिनिटात पूर्ण केले.
ट्राझिट -२ साठी १० मिनिटे ४२ सेकंद वेळ देऊन पुढे त्यांनी ४२.२ कि.मी.धावण्याचे अंतर सहा तास १२ मिनिटे १७ सेकंदात पूर्ण करत एकूण १४ तास ५५ मिनिटे या विक्र मी वेळेत अंतिम अंतराची सीमा गाठून भारताचा तिरंगा आॅस्ट्रेलियात फडकवला.
आयर्न मॅन १४०.६ स्पर्धा पूर्ण करणारे ते राज्यातील पहिले शासकीय अधिकारी ठरले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे, सह-आयुक्त शिवाजी देसाई व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी दिलेले प्रोत्साहनामुळेच ही स्पर्धा पार करण्यासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरल्याचे ढाणे यांनी सांगितले.