आशियाड, कॉमनवेल्थसाठी ‘फिटनेस’वर भर - योगेश्वर दत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:36 AM2017-08-11T01:36:25+5:302017-08-11T01:36:28+5:30
आॅलिम्पिक कांस्यविजेता मल्ल योगेश्वर दत्त याने वर्षभरात एकही स्पर्धा खेळलेली नाही. पुढील आशियाड आणि राष्टÑकुल स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी फिटनेसवर अधिक भर देत असल्याचे योगेश्वरने सांगितले. मागील काही वर्षांपासून जखमांमुळे त्रस्त असलेल्या योगेश्वरने रिओ आॅलिम्पिकनंतर कुठलीही स्पर्धा खेळली नाही.
नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यविजेता मल्ल योगेश्वर दत्त याने वर्षभरात एकही स्पर्धा खेळलेली नाही. पुढील आशियाड आणि राष्टÑकुल स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी फिटनेसवर अधिक भर देत असल्याचे योगेश्वरने सांगितले. मागील काही वर्षांपासून जखमांमुळे त्रस्त असलेल्या योगेश्वरने रिओ आॅलिम्पिकनंतर कुठलीही स्पर्धा खेळली नाही. यापुढे मात्र मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धा खेळायच्याच, असा निर्धार त्याने व्यक्त केला. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त कोच कॅप्टन चांदरूप यांच्या प्रतिमेचे अनावरण केल्यानंतर योगेश्वर म्हणाला, ‘‘काही महिने जखमांशी झुंजण्यात गेल्यानंतर आता फिटनेससाठी सकाळ- सायंकाळ ५ तास सराव करीत आहे.’’ देशाला पाच आॅलिम्पियन मल्ल देणारे कॅप्टन चांदरूप यांचे अलीकडे २ मे रोजी वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले.
लंडन आॅलिम्पिकमध्ये ६० किलोगटाचा कांस्यविजेता असलेला ३४ वर्षांचा योगेश्वर म्हणाला, ‘‘फिट झाल्यास आशियाड आणि राष्टÑकुल स्पर्धेत खेळण्यास प्राधान्य असेल. सध्या टोकियो आॅलिम्पिकचा विचारही केला नाही.’’
योगेश्वर आणि दोन आॅलिम्पिक पदकविजेता सुशीलकुमार हे टोकियो आॅलिम्पिक खेळतील का, हे अद्याप निश्चित नाही. तथापि, देशात प्रतिभावान मल्लांची उणीव नसल्याने पदक जिंकण्याची मोहीम पुढेही सुरूच राहील, असा विश्वास योगेश्वरने व्यक्त केला. तो पुढे म्हणाला, ‘‘विश्व ज्युनियर स्पर्धेत आमच्या मल्लांनी नुकतीच चांगली कामगिरी केली. फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला कुस्तीत पदक जिंकण्याचा अर्थ आमच्याकडे प्रतिभा आहे, असाच होतो. हेच खेळाडू मेहनतीच्या बळावर पुढे सिनियर गटात देशासाठी पदकविजेते बनू शकतील. (वृत्तसंस्था)
विश्व चॅम्पियशिपमध्ये भारतीयांची परीक्षा
भारतीय मल्लांची पहिली कठोर परीक्षा याच महिन्यात पॅरिस येथे विश्व चॅम्पियनशिपमध्ये होईल. या स्पर्धेत साक्षी मलिक, विनेश फोगाट या महिला मल्लांसह बजरंग पुनिया, संदीप तोमर आणि प्रवीण राणा यांच्याकडून पदकांची अपेक्षा बाळगता येईल. पुरुष गटात तिन्ही मल्ल सिनियर असून त्यांना अनुभव आहे. साक्षी आणि विनेश यांच्याकडून पुढील आॅलिम्पिकमध्येही पदकाची अपेक्षा आहे.