योगेश्वर दत्त करणार भारताचे नेतृत्व
By admin | Published: July 8, 2015 01:06 AM2015-07-08T01:06:37+5:302015-07-08T01:06:37+5:30
लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त हा अमेरिकेतील लॉस वेगास येथे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.
नवी दिल्ली : लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त हा अमेरिकेतील लॉस वेगास येथे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.
२०१६ च्या रियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करण्यासाठी भारतीय मल्लांना विश्व स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेसाठी खाशाबा जाधव कुस्ती स्टेडियममध्ये भारतीय संघाची निवड चाचणी घेण्यात आली. ही चाचणी एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेशी अशीच होती. छत्रसाल आखाड्याचे प्रतिनिधित्व करणारा योगेश्वर ६५ किलो वजनी गटात विजयी ठरला. चुरशीच्या लढतीत त्याने अमित धनकड याच्यावर ६-३ ने विजय साजरा केला. अमित कुमार याने संदीप तोमरवर ३-२ ने विजय नोंदविला. सलग दोन आॅलिम्पिकमध्ये पदक विजेता सुशील कुमार आणि राष्ट्रकुलचा पदक विजेता बजरंग(६१ किलो) हे जखमेमुळे चाचणीत सहभागी होऊ शकले नाहीत.
लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता योगेश्वरशिवाय आॅलिम्पियन नरसिंग यादव, राष्ट्रकुल पदक विजेता अमित कुमार, आशियाई पदक विजेता मौसम खत्री यांनी आपापल्या अंतिम लढती जिंकून विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. अरुणला ७० किलो गटात पुढे चाल मिळाली. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवड पॅनलच्या देखरेखीत चाचणी पार पडली. महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंग यांनी स्वत: उपस्थित राहून मल्लांना प्रोत्साहन दिले.
ते म्हणाले, ‘‘चाचणी पाहण्यासाठी स्टेडियम खच्चून भरल्याचा मला आनंद आहे. यावरून आमच्याकडे मल्लांची दुसरी फळी सज्ज असून, भविष्यात पदक जिंकू शकतात, हा विश्वास आला. चाचणीच्यावेळी महाबली सतपाल, महासंघाचे उपाध्यक्ष राजसिंग आणि निवड समितीचे कार्यकारी सदस्य रेखा यादव यांनीदेखील हजेरी लावली.’’ (वृत्तसंस्था)
भारतीय फ्री स्टाईल कुस्ती संघ
अमित कुमार ५७ किलो, सोनू ६१ किलो, योगेश्वर दत्त ६५ किलो, अरुण ७०, नरसिंग यादव ७४ किलो, नरेश कुमार ८६ किलो, मौसम खत्री ९७ किलो आणि सुमित १२५ किलो.
कोटा मिळविणाऱ्यालाच आॅलिम्पिकला पाठवा : नरसिंग यादव
> स्टार मल्ल सुशीलकुमार खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने नरसिंग यादव याला आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी कुस्ती खेळण्याची संधी मिळाली. रियो आॅलिम्पिकसाठी आपली निवड व्हावी, यासाठी आपण कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नसल्याचा निर्धार नरसिंगने व्यक्त केला.
> २५ वर्षांच्या नरसिंगने प्रवीण राणा याला लोळवून विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. तो रियो आॅलिम्पिकची पात्रता मिळविण्याबद्दल आश्वस्त आहे. नियमानुसार आॅलिम्पिक कोटा हा खेळाडूला नव्हे, तर देशाला मिळतो. पुरुष फ्री स्टाईल संघाचे मुख्य कोच कुलदीप मलिक आणि सुशील यांनी आधीच स्पष्ट केले, की ७४ किलो वजनगटात भारतासाठी कोण खेळेल, याचा निर्णय रियो आॅलिम्पिकआधीच्या फॉर्मवर अवलंबून असेल.
> नरसिंगचे विचार यापेक्षा वेगळे आहेत. तो म्हणतो, ‘‘ज्याने आॅलिम्पिक कोटा मिळविला असेल, त्याच मल्लाला आॅलिम्पिक खेळण्याची संधी देण्यात यावी.’’