योगेश्वरकडून देशवासीयांना सुवर्णनिरोपाची अपेक्षा
By admin | Published: August 21, 2016 05:21 AM2016-08-21T05:21:59+5:302016-08-21T08:09:02+5:30
एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ आॅलिम्पिकच्या
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. २१ : एकीकडे महिला कुस्तीपटू साक्षी मलिकच्या कांस्यपदकाचा आनंद, तर दुसरीकडे नरसिंग यादववर घालण्यात आलेल्या बंदीचे दु:ख या पार्श्वभूमीवर योगेश्वर दत्त रिओ आॅलिम्पिकच्या रविवारी शेवटच्या दिवशी भारताला सुवर्णनिरोप देण्याच्या इराद्याने उतरेल, अशी देशवासीयांना अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत रिओ आॅलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. भारताकडे आता योगेश्वरच्या रूपाने पदकाची शेवटची आशा शिल्लक आहे.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी ६५ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाईल प्रकारात योगेश्वर पदकाच्या अपेक्षेने उतरणार आहे. आॅलिम्पिकला जाण्यापूर्वी योगेश्वरने आपण सुवर्णपदकाने कारकिर्दीची सांगता करणार असल्याचे म्हटले होते.
भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये आठ पैलवानांचा चमू उतरवला होता. यामध्ये साक्षी मलिकने अनपेक्षित कामगिरी करीत कांस्यपदक मिळविले. परंतु सुवर्णपदकाची अपेक्षा असलेला नरसिंग यादव डोप टेस्टमध्ये अडकल्यामुळे देशाला नरसिंगच्या धक्क्यातून सावरण्याची आणि पदक मिळवून देण्याची जबाबदारी आता योगेश्वरवर आली आहे.
योगेश्वरने जर पदक जिंकले तर तो दोन आॅलिम्पिक पदके जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू बनेल. आतापर्यंत हा पराक्रम फक्त सुशीलकुमारनेच केला आहे. साक्षी आणि सिंधूच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशवासीयांच्या नजरा आता योगेश्वरच्या सुवर्णनिरोपाकडे लागल्या आहेत. लंडन आॅलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तने कांस्यपदक पटकावले होते.