पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव

By admin | Published: August 22, 2016 04:43 AM2016-08-22T04:43:28+5:302016-08-22T04:43:28+5:30

कुस्तीमधील भारताच्या पदकाचे ज्यावर सर्वात जास्त आशा होत्या तो योगेश्वर दत्त प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला.

Yogeshwar's defeat in the first match | पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव

पहिल्याच लढतीत योगेश्वरचा पराभव

Next

शिवाजी गोरे,

रिओ : कुस्तीमधील भारताच्या पदकाचे ज्यावर सर्वात जास्त आशा होत्या तो योगेश्वर दत्त प्राथमिक फेरीतच पराभूत झाल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला. पुरुषांच्या ६५ किग्रा वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेला सुरुहोताच भारतीयांच्या नजरा लंडन आॅलिम्पिकमधील कांस्य विजेता योगेश्वरकडे लागल्या होत्या. मात्र मंगोलियाच्या गंजोरिजिन मंदाखनारनविरुध्द एकतर्फी सामन्यात पराभूत झाल्याने भारतीयांच्या पदरी निराशा आली.
या निराशानजनक पराभवानंतर भारताच्या पदकाच्या आशा आता पुर्णपणे मंदाखनारनच्या कामगिरीवर अवलंबून राहिल्या आहेत. जर, मंदाखनारन या गटाच्या अंतिम फेरीत पोहचला, तर योगेश्वरला कांस्य पदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे. मंदाखनारन २०१० आशियाई सुवर्णविजेता असून दोन वेळचा जागतिक अजिंक्यपद कांस्य विजेता आहे. त्यामुळे त्याच्याकडून अंतिम फेरीची अपेक्षा केली जात आहे.
मंदाखनारन अंतिम फेरीत पोहचल्यास योगेश्वरला दोन रेपचेज फेऱ्या खेळावे लागतील. यानंतरच तो, कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये जागा निश्चित करु शकेल. हरियाणाचा हा ३३ वर्षीय मल्ल आपल्या कारकिर्दीतील चौथा आॅलिम्पिक खेळत असून त्याचीही जवळजवळ अखेरची आॅलिम्पिक आहे. अत्यंत एकतर्फी झालेल्या पहिल्या लढतीत योगेश्वरला मंदाखनारनने ३-० अशी धूळ चारली.
या लढतीच्या सुरुवातीपासूनच मंदाखनारनवर पकड मिळवण्यात योगेश्वरला अपयश आले. मंदाखनारनच्या वेगवान हालचालींपुढे योगेश्वरचा काहीच निभाव लागला नाही. त्यातच, योगेश्वरच्या निराशाजनक कामगिरीचा फायदा घेत ३० सेकंदात एक गुण घेत मंदाखनारनने आपले खाते उघडले. यानंतर आक्रमक झालेल्या मंदाखनारने योगेश्वरला खाली पाडून वेगवान दोन गुणांची कमाई करुन मजबूत आघाडी घेतली.
पहिल्या फेरीत अखेरचा एक मिनिट बाकी असताना योगेश्वरला पकड मिळवण्यात अपयश आल्याने विश्रांतीपर्यंत तो पिछाडीवर राहिला. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रिओ पात्रता मिळवणाऱ्या योगेश्वरकडून दुसऱ्या फेरीत पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, यामध्येही त्याला यश आले नाही. लढतीच्या अंतिम क्षणी त्याने मंदाखनारनला खाली पाडण्याचा अप्रतिम प्रयत्न केला. मात्र, यामध्येही त्याला यश मिळाले नाही.
>...आणि पदकाचे स्वप्नही धुळीस मिळाले
पहिल्या फेरीत मंदाखनारनविरुध्द पराभूत झाल्यानंतर योगेश्वरचे लक्ष रेपचेज फेरीकडे लागले होते. मात्र, यासाठी मंदाखनारन अंतिम फेरीत पोहचणे अनिवार्य होते. लंडन आॅलिम्पिकमध्येही योगेश्वरने कांस्य पटकावले होते. त्याचवेळी मंदाखनारन उपांत्यपुर्व फेरीपर्यंत पोहचण्यात यशस्वी ठरल्यानंतर योगेश्वरच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, याफेरीत २०१४ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पटकावलेल्या रशियाच्या सोसलान लुडविकोविचविरुध्द एकतर्फी ०-६ असे पराभूत व्हावे लागले.
त्यामुळे, मंदाखनारनच्या या पराभवाने योगेश्वरचे पदक मिळवण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. यासह सात सदस्यांच्या भारतीय कुस्ती संघाला साक्षी मलिकने पटकावलेल्या कांस्यच्या रुपाने केवळ एका पदकावर समाधान मानावे लागले.

Web Title: Yogeshwar's defeat in the first match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.