मल्ल योगेश्वरची भावनात्मक साद!
By admin | Published: September 1, 2016 04:57 AM2016-09-01T04:57:30+5:302016-09-01T04:57:30+5:30
भारतीय मल्ल योगेश्वर दत्त याला २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक रौप्यामध्ये बदलल्यानंतरही तो हे पदक घेण्यास तयार नाही
नवी दिल्ली : भारतीय मल्ल योगेश्वर दत्त याला २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये मिळालेले कांस्यपदक रौप्यामध्ये बदलल्यानंतरही तो हे पदक घेण्यास तयार नाही. मानवी संवेदना माझ्या पदकापेक्षा मोठ्या असल्याची योगेश्वरची भावना आहे. त्याने रौप्यपदक दिवंगत रशियन मल्लाच्या कुटुंबीयांकडेच कायम राहू द्या, असे आवाहन केले.
दुसऱ्या स्थानावर राहिलेला रशियाचा मल्ल बेसिक कुडुकोव्ह हा २७ व्या वर्षी कार अपघातात मरण पावला. मृत्यूनंतर तो डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने त्याचे पदक काढून घेण्यात येऊन ते योगेश्वरला प्रदान करण्याचा निर्णय झाला आहे. योगेश्वरने मात्र ते पदक कुडुकोव्ह याच्या कुटुंबाकडे राहू द्या, असे आवाहन करीत पुढे टिष्ट्वट केले, ‘कुडुकोव्ह शानदार मल्ल होता. मृत्यूनंतर डोप चाचणीत अपयशी ठरणे दुर्दैवी आहे. एक खेळाडू या नात्याने मी त्याचा सन्मान करतो. शक्य झाल्यास हे पदक त्याच्या घरी राहू द्या. पदक हे त्याच्या कुटुंबीयांसाठी आठवण असेल. माझ्यासाठी मानवी संवेदना सर्वतोपरी आहेत.’
चार वेळेचा विश्व चॅम्पियन तसेच दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता कुडुकोव्ह द. रशियात २०१३ साली झालेल्या कार अपघातात मरण पावला. २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या नमुन्याची चाचणी वाडाने रिओ आॅलिम्पिकआधी दुसऱ्यांदा केली तेव्हा तो डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळला होता.
या निर्णयानंतर योगेश्वर हा सुशीलकुमारसोबत लंडन आॅलिम्पिकच्या कुस्तीत रौप्य मिळविणारा दुसरा मल्ल ठरला. योगेश्वर लंडन आॅलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत कुडुकोव्हकडून पराभूत झाला. नंतर रशियाचा मल्ल अंतिम फेरीत दाखल होताच रेपेचेज नियमानुसार खेळण्याची संधी मिळताच योगेश्वरने कांस्यपदक जिंकले. युनायटेड कुस्ती या विश्व संस्थेकडून अंतिम मंजुरी मिळताच भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून योगेश्वरला रौप्यपदक सोपविले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
नमुना तपासल्यानंतरच योगेश्वर दत्तला
मिळणार रौप्य
मल्ल योगेश्वर दत्त याला लंडन आॅलिम्पिकमध्ये मिळालेल्या कांस्यचे रूपांतर रौप्यपदकात होणार असले, तरी त्याच्या डोपिंग चाचणीचा अहवाल योग्य आल्यानंतरच त्याला हे पदक दिले जाईल. विश्व डोपिंगविरोधी संस्थेकडून (वाडा) त्याचा नमुना योग्य असल्याचा अहवाल अपेक्षित आहे.
रौप्यविजेता रशियाचा बेसिक कोडुकोव्ह डोप परीक्षणात फेल झाल्यामुळेच त्याचे
पदक हिसकावून घेण्यात आले आहे. ते योगेश्वरला मिळेल. वाडाने २०१२मध्ये योगेश्वरचे सॅम्पल चाचणीसाठी घेतले होते. याचा अहवाल योग्य
आल्यास योगेश्वरला पदक देण्यास अडसर येणार
नाही, असे वाडाने म्हटले आहे.