उत्तर प्रदेश सरकारनं टोक्यो ऑलिम्पिक पदक विजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उघडली तिजोरी, भव्य सत्कार समारंभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 12:09 PM2021-08-20T12:09:56+5:302021-08-20T12:10:21+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक जिंकेल, तर बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोरगोईन, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पुरुष हॉकी संघानं कांस्यकमाई केली.
जय हो... https://t.co/UULhnVqWeg
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 19, 2021
टोक्योतून परतलेल्या या पदकविजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. लखनौ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सुवर्णपदक विजेत्या नीरजला दोन कोटींचा धनादेश देण्यात आला. याशिवाय रवि दहिया व मीराबाई चानू या रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड कोटी आणि पी व्ही सिंधू, लवलिना, बजरंग यांच्यासह पुरुष हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी बक्षीस दिलं गेलं.
Video : नीरज चोप्रा ऑलिम्पिक पदक विजेता आहे, बिग बॉस विजेता नाही; मलिष्कावर खवळले नेटिझन्स!
टोक्योत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं बक्षीसही योगी सरकारनं दिले. यासह मीराबाई चानूचे प्रशिक्षक उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद येथील विजय शर्मा यांना १० लाख, पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकांना २५ लाख व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख दिले गेले. महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १० लाख दिले गेले. कुस्तीपटू दीपक पूनिया व गोल्फपटू अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख दिले गेले. टोक्योत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशमधील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.