युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडचं लोटांगण, मालिकाही जिंकली
By admin | Published: February 1, 2017 10:19 PM2017-02-01T22:19:38+5:302017-02-01T23:38:35+5:30
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 1 - चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 धावांनी पराभव केला. 6 विकेट घेणा-या फिरकीपटू युजवेंद्र चहलसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलं. 203 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा डाव केवळ 127 धावातच आटोपला. यासोबत भारताने टी-20 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.
पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे तिस-याही सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकले. इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या दुस-याच षटकात विराट कोहली केवळ 2 धावांवर धावबाद झाला. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या सुरेश रैनाने के.एल राहुलच्या साथीने इंग्लंडवर प्रतिआक्रमण चढवत धावांची गती कमी होऊ दिली नाही. भारताकडून रैना(63), धोनी(56) आणि युवराजने(27) तुफान फटकेबाजी केली. या जोरावर भारताने इंग्लंडला 203 धावांचं आव्हान दिलं होतं.
203 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरूवातही खराब झाली. दुस-याच षटकात फिरकीपटू चहलने इंग्लंडचा सलामीवीर एस बिलिंग्सला भोपळाही फोडू न देता रैनाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या जो रूटने जेसन रॉयच्या साथीने भारताच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. रॉय मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. 32 धावांवर रॉयला मिश्राने बाद केलं. त्याच्याजागी आलेल्या मॉर्गन आणि रूट जोडीने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मात्र, 14 व्या षटकात मॉर्गन(40) आणि रूटला(42) लागोपाठ बाद करत चहलने इंग्लंडचं कंबरडं मोडलं. त्यानंतर तर इंग्लंडचे फलंदाज मैदानात केवळ हजेरी लावण्यासाठी येत होते. इंग्लंडचे शेवटचे आठ फलंदाज केवळ 8 धावातच परतले, तर इंग्लंडच्या 6 फलंदाजांना भोपळाही फोडता नाही आला. भारताकडून चहलने 4 षटकात केवळ 25 धावा देत 6 गडी बाद केले. त्याला जसप्रित बुमराहने तीन विकेट घेत योग्य साथ दिली. अमित मिश्रानेही एक विकेट घेतली.