यू मुंबा ‘चॅम्पियन’

By admin | Published: August 23, 2015 11:48 PM2015-08-23T23:48:59+5:302015-08-23T23:49:17+5:30

पहिल्या सामन्यापासून यंदाचे विजेते आपणच असल्याच्या थाटात खेळणाऱ्या बलाढ्य यू मुंबाने आपला धडाका अंतिम सामन्यातही कायम राखला. बंगळुरु बुल्सचे तगडे आव्हान

You Mumba 'champion' | यू मुंबा ‘चॅम्पियन’

यू मुंबा ‘चॅम्पियन’

Next

रोहित नाईक, मुंबई
पहिल्या सामन्यापासून यंदाचे विजेते आपणच असल्याच्या थाटात खेळणाऱ्या बलाढ्य यू मुंबाने आपला धडाका अंतिम सामन्यातही कायम राखला. बंगळुरु बुल्सचे तगडे आव्हान ३६-३० असे धुडकावत यू मुंबाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राचे दिमाखदार विजेतेपद उंचावले. तणावपूर्ण झालेल्या या सामन्यात भक्कम बचावाच्या जोरावर मुंबईकरांनी बाजी मारली.
वरळीच्या एनएससीआय स्टेडियममध्ये घरच्या प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा लाभलेल्या मुंबईकरांनी गतस्पर्धेतील सगळी कसर भरून काढली. सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व कायम राखताना यू मुंबाने लौकिकानुसार खेळ केला. पहिल्या सत्रात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या हुकमी शब्बीर बापूने दुसऱ्या सत्रात निर्णायक खेळ केला. कर्णधार अनुप कुमारने पहिल्याच चढाईत संघाचे खाते उघडून सकारात्मक सुरुवात केली. बंगळुरुनेदेखील तोडीस तोड खेळ करून सामना समान स्थितीत ठेवला होता.
यानंतर मात्र मुंबईकरांनी जोरदार मुसंडी मारताना आपला हिसका दाखवण्यास सुरुवात केली. अनुप व रिशांक देवाडिगा यांनी केलेल्या काही चांगल्या चढाया व बचावफळीने दिलेल्या योगदानाच्या जोरावर यू मुंबाने मध्यंतराला एक लोण चढवून १६-८ अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी निर्णायक ठरणार, असे दिसत होते. मात्र, बंगळुरुने झुंजार पुनरागमन करत मुंबईकरांवर जबरदस्त दडपण टाकले.
दुसऱ्या सत्रात बंगळुरुच्या आक्रमणाची सर्व सूत्रे कर्णधार मनजित चिल्लरने स्वत:कडे घेताना आक्रमणात ९, तर बचावामध्ये २ गुण मिळवत शानदार अष्टपैलू खेळ केला. त्याचबरोबर अजय ठाकूरनेदेखील त्याला उपयुक्त साथ दिली. अजयने ३३ व्या मिनिटाला सुपर रेड करताना मुंबईवर लोण चढवून सामना २३-२३ असा रोमांचक स्थितीत आणला. या वेळी मुंबईकरांच्या हातून विजेतेपद निसटते की काय, अशी शक्यता होती. मात्र, शब्बीरने धडाकेबाज खेळ करताना एकहाती सामना फिरवला. विशाल माने, रिशांक, जीवा कुमार आणि अनुप यांनी अखेरपर्यंत मजबूत पकड ठेवताना संघाला विजयी केले.
दरम्यान, सामन्यातील अखेरच्या चढाईमध्ये मुंबईकरांचा विजय स्पष्ट झाल्यानंतर अखेरची चढाई करीत असलेल्या मुंबईचा कर्णधार अनुप कुमारचे बंगळुरुचा कर्णधार मनजितने अभिनंदन करून आपला पराभव मान्य केला.

टायटन्स तिसऱ्या स्थानी...
स्पर्धेत तृतीय स्थानासाठी झालेल्या लढतीत तेलुगू टायटन्सने एकतर्फी झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सचे आव्हान ३४-२६ असे परतावून तिसऱ्या स्थानी कब्जा केला. संघाचा माजी कर्णधार राहुल चौधरी आणि प्रशांत राय यांच्या आक्रमक चढाया व दीपक हुडाचा भक्कम बचाव टायटन्सच्या विजयात निर्णायक ठरला. मध्यंतरालाच टायटन्सने १८-६ अशी आघाडी घेत नियंत्रण मिळवले होते. पायरेट्सकडून कर्णधार संदीप नरवाल आणि सुनील कुमार यांनी अपयशी झुंज दिली.

इतर पारितोषिके
उद्योन्मुख खेळाडू : संदीप (तेलुगू टायटन्स)
सर्वोत्कृष्ट आक्रमक : काशिलिंग आडके (दबंग दिल्ली)
सर्वोत्कृष्ट बचावपटू : रवींद्रसिंग पहेल (दबंग दिल्ली)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : मनजित चिल्लर (बंगळुरु बुल्स)

Web Title: You Mumba 'champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.