युवा श्रीलंकेची भारताशी लढत
By admin | Published: February 9, 2016 03:35 AM2016-02-09T03:35:59+5:302016-02-09T03:35:59+5:30
दुखापतग्रस्त श्रीलंकेच्या संघाला तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यू, नुआन कुलशेखरा, रंगना हेरथ, यांच्या पाठोपाठ आता बिनुरा फर्नांडो याच्याशिवायच मंगळवारी होणाऱ्या
- विशाल शिर्के, पुणे
दुखापतग्रस्त श्रीलंकेच्या संघाला तिलकरत्ने दिलशान, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यू, नुआन कुलशेखरा, रंगना हेरथ, यांच्या पाठोपाठ आता बिनुरा फर्नांडो याच्याशिवायच मंगळवारी होणाऱ्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात उतरावे लागेल. तुलनेने युवा संघांची लढत भारताच्या महेंद्रसिंह धोनी याच्या संघाशी होणार आहे. टी-टष्ट्वेन्टी सामन्यात आॅस्ट्रेलियाविजय करून परतलेल्या तगड्या भारताचे आव्हान श्रीलंकेच्या खेळाडूंना पेलावे लागेल.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सायंकाळी साडेसात वाजता तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी सोमवारी श्रीलंका व भारताच्या खेळाडूंनी गहुंजे मैदानावर सराव केला. दुखापतींमुळे श्रीलंकेचे अनुभवी व प्रमुख खेळाडू या सामन्यात खेळू शकणार नाहीत. त्यातच नेटमध्ये सराव करताना जलदगती गोलंदाज फर्नांडो याच्या स्नायूला दुखापत झाल्याने मालिकेत तोदेखील मंगळवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी शमिंडा एरंगा याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २०१४च्या टी-टष्ट्वेन्टी विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघातील कमान आता युवा खेळाडूंवर असेल. दिलशानच्या बोटाला दुखापत झाल्याने पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. मात्र त्या पुढील दोन्ही सामन्यांसाठी तो उपलब्ध असेल.
दुसरीकडे भारताकडून बहरात असलेल्या विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. फलंदाजीत सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे व मनीष पांडे यांच्याकडे फलंदाजीची धुरा असेल. आॅस्ट्रेलियात पांडेने अंतिम सामन्यात विजयी खेळी केली होती. त्यालादेखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही चांगली संधी असेल. गोलंदाजीच्या आक्रमणाची धुरा भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, जसप्रित बुमरा यांच्यावर असेल. या शिवाय रविचंद्रन आश्विन, हरभजन सिंग, पवन नेगी, रवींद्र जडेजा यांचादेखील पर्याय उपलब्ध आहे. या शिवाय रैना व युवराजकडेदेखील चेंडू सोपविता येऊ शकतो. दुखापतीने ग्रस्त असलेल्या श्रीलंकन संघाच्या तुलनेत भारतीय संघ बलाढ्य आहे. मात्र टी-ट्वेन्टी प्रकारात दहा-बारा चेंडूसुद्धा सामन्याचे पारडे फिरवू शकतात. त्यामुळे भारतीय खेळाडू याचा विचार करूनच मैदानावर उतरतील.
पुणेरी प्रेक्षक लय भारी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा कर्णधार असलेला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला पुण्याविषयी विचारले असता त्याने पुणेरी प्रेक्षकांचे भरपूर कौतुक केले. तो म्हणाला, पुणे माझ्यासाठी खास आहे. मुख्य शहरापासून मैदान दूर असले तरी येथे पे्रक्षकांचा खूप पाठिंबा मिळतो. मैदानावर कायम पाठीराख्यांची गर्दी असते.
हेड टू हेड
भारत व श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये एकूण ६ टी-२० लढती झाल्या आहेत. यामध्ये भारत व श्रीलंका या दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले आहे.
दोन्ही संघांमध्ये २००९-१० मध्ये दोन सामन्यांची टी-२० मालिका झाली होती. या वेळी दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकून मालिका बरोबरीत राहिली होती.
टी-२० मध्ये युवराज सिंगच्या १००० धावा पूर्ण होण्यासाठी त्याला १७ धावांची आवश्यकता आहे. जर त्याने श्रीलंकेविरुद्ध त्या पूर्ण केल्या तर तो भारतातील पल्ला गाठणारा तो चौथा फलंदाज ठरेल.
भारतीय संघाची फलंदाजी आठव्या खेळाडूपर्यंत आहे. हार्दिक पंड्या या क्रमांकावर आल्यास पुढील खेळाडू मुक्तपणे खेळू शकतील. सध्याचा भारतीय संघ संतुलित असून, फलंदाज व गोलंदाजीत वैविध्य आहे. सुरेश रैना व युवराजदेखील प्रसंगी गोलंदाजी करू शकतात. आॅस्ट्रेलिया विजयामुळे संघाचे मनोबल वाढले आहे. सध्या सामन्यात विजय मिळविण्याबरोबरच विश्वचषक स्पर्धेसाठी तंदुरुस्त संघ तयार ठेवणे हे लक्ष्य आहे.
- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार भारत
श्रीलंकेचे अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. संघाचे पाच खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे आशियाई चषक व विश्वचषक स्पर्धेपूर्वी होत असलेल्या या मालिकेत युवा खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची ही एक मोठी संधी असेल. प्रत्येक संघाला कधीना कधी अशा समस्येला सामोरे जावेच लागते. मात्र अशा परिस्थितीतही आमचा संघ निश्चितच आपला सर्वोत्तम खेळ करेल.
- दिनेश चंडिमल, कर्णधार श्रीलंका
यातून संघ निवडणार
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग, हार्दिक पंड्या, जसप्रित बुमराह, मनीष पांडे, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना, पवन सिंग, युवराज सिंग, शिखर धवन.
श्रीलंका : दिनेश चंदिमल (कर्णधार), सेकुगे प्रसन्न, मिलिंदा सिरीवर्धना, धनुषा गुनातिलाका, थिसारा परेरा, दासुन शनाका, असेला गुणरत्ने, चामरा कापूगेदेरा, दुशमंथा चामिरा, दिलहारा फर्नांडो, कासुन रजिता, शमिंडा एरंगा, सचित्रा सेनानायके, जेफ्रे वांदेरसे, निरोशन डिकवेला.
सामन्याची वेळ :
रात्री ७.३० वा. पासून
स्थळ :
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे