‘युवा महिला बॉक्सर समाजासाठी प्रेरणा’ - क्रीडामंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:29 AM2017-12-09T03:29:06+5:302017-12-09T03:30:03+5:30
‘‘मुली काहीच खेळात सहभागी होतात, हा समज तुम्ही चुकीचा ठरविला. मुली देखील सर्वच खेळात बाजी मारु शकतात, हे सिद्ध केले.
नवी दिल्ली : ‘‘मुली काहीच खेळात सहभागी होतात, हा समज तुम्ही चुकीचा ठरविला. मुली देखील सर्वच खेळात बाजी मारु शकतात, हे सिद्ध केले.या खेळात सरावासाठी तुम्हाला किती समस्या आल्या असतील, याची मला जाणिव आहे.यामुळेच तुम्ही समाज आणि मुलींसाठी प्रेरणा आहात. तुमचा प्रवास नव्या खेळाडूंपर्यंत जायला हवा. तुमची वाटचाल ऐकून अनेक मुली खेळात पुढे येऊ शकतील.’’ आॅलिम्पिक रौप्य विजेते नेमबाज आणि देशाचे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी शुक्रवारी एआयबीए विश्व युवा बॉक्सिंग स्पर्धेत पदक विजेत्या मुलींबद्दल हे गौरवोद्गार काढले.
गुवाहाटी येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत मुलींनी एकूण सात पदके जिंकली होती. सर्व खेळाडूंची जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये भेट घेत राठोड यांनी सहा लाख ७० हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर केला.
राठोड पुढे म्हणाले, ‘खेळात प्रगती होण्यासाठी प्रत्येक खेळासाठी एक सीईओ आणि हाय परफॉमर्न्स मॅनेजर नियुक्त करण्यावर मंत्रालय विचार करीत आहे. आॅलिम्पिक पोडियम योजनेचा हा एक भाग असेल.’ तसेच, खेळात पारदर्शीपणा यायला हवा यावर भर देत राठोड यांनी सर्व क्रीडा महासंघानांना आपल्या वेबसाईटवर जमा खर्चाची माहिती देण्याचे आवाहन केले. यावेळी विश्व चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिचीही विशेष उपस्थिती होती.