युवा विश्व तिरंदाजी स्पर्धा : सुखमनीने जिंकून दिले महाराष्ट्राला पहिले रौप्य, जेम्सन एन. व अंकिता भाकटला सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:27 AM2017-10-10T01:27:17+5:302017-10-10T01:27:38+5:30
अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले.
रोसारियो (अर्जेंटिना) : अमरावतीच्या सुखमनी बाबरेकरने विश्व युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक गटात जेम्सन सिंग व अतुल वर्माबरोबर अचूक लक्ष्य साधत ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात महाराष्ट्राला पहिले रौप्यपदक जिंकून दिले.
मिश्र गटात भारताच्या जेम्सन सिंग एन. आणि अंकिता भाकट जोडीने सांघिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक जिंकले. राज्य शासनाच्या अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत सराव करीत असलेला सुखमनी ही कामगिरी करणारा पहिला महाराष्ट्राचा खेळाडू ठरला आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण तीन पदके आपल्या नावावर केली.
या स्पर्धेत नववे मानांकन असलेल्या जेम्सन आणि भाकट जोडीने उपांत्यपूर्व फेरीत अव्व्ल मानांकित कोरिया संघाचा पराभव केला. कंपाउंड कॅडेट महिला प्रकारात खुशबू दयाल, संचिता तिवारी आणि दिव्या धवल यांनी प्लेआॅफमध्ये ग्रेट ब्रिटन संघाचा २१२-२०६ गुणांनी पराभव करीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. दीपिका कुमारीने २००९ आणि २०११ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूंची ही पहिली कामगिरी आहे.