दिल्लीच्या युवा खेळाडूंनी धैर्य दाखवावे
By admin | Published: April 28, 2017 02:04 AM2017-04-28T02:04:31+5:302017-04-28T02:04:31+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीबाबत आशावादी व सकारात्मकता स्पष्ट करणाऱ्या राहुल द्रविडच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले.
रवी शास्त्री लिहितात...
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीबाबत आशावादी व सकारात्मकता स्पष्ट करणाऱ्या राहुल द्रविडच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले. दिल्ली संघाला अलीकडे मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तरी राहुल द्रविड मात्र संघाच्या प्लेआॅफच्या संधीबाबत आशावादी दिसला. युवा खेळाडूंच्या कामगिरीबाबत द्रविड आशावादी आहे. संघाला मार्गदर्शन करताना द्रविड गंभीर होता. द्रविडच्या वक्तव्याचा आपल्यालाही गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ‘प्ले आॅफ’साठी पात्रता मिळविण्यासाठी संघाने सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे, असे द्रविडला वाटते. आकडेवारीचा विचार करता त्यासाठी दिल्ली संघाला उर्वरित आठपैकी सहा सामने जिंकणे आवश्यक आहे. संघातील युवा खेळाडूंनी धैर्य दाखविले तर पर्वतावरही पाणी नेता येईल आणि सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो.
दिल्ली संघाला फलंदाजीमध्ये अतिरिक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करीत असून, प्रतिस्पर्धी संघाला सातत्याने १६० धावसंख्येच्या जवळपास रोखण्यात यशस्वी ठरत आहेत. अशा स्थितीत फलंदाजांना प्रत्येक चेंडूवर जोखीम पत्करण्याची गरज नाही. त्यांना केवळ एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या जास्तीत जास्त विकेट १० षटकांनंतरच्या खेळासाठी राखून ठेवायला हव्यात.
आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार केला, तर आयपीएलमध्ये दिल्लीच असा एकमेव संघ आहे की, त्यांना आपल्या पूर्णक्षमतेनुसार मैदानात उतरता आलेले नाही. भारतातील काही प्रतिभावान युवा खेळाडू या फ्रँचायझीचे सदस्य आहेत. इंजिन असलेल्या खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली आणि कुठे अडथळा निर्माण झाला नाही तर ही गाडी महामार्गावर धावण्यासाठी तयार झाली असल्याची प्रचिती येईल.
दिल्ली संघाला यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. दिल्लीचा संघ कोलकाता संघाला त्यांच्याच गृहमैदानावर पराभूत करण्यात यशस्वी ठरला, तर डेअरडेव्हिल्स संघाला स्वत:च्या क्षमतेची कल्पना येईल. येथे विजय मिळवला तर त्यांच्यासाठी पुढची वाटचाल योग्य दिशेने होईल, पण त्यासाठी त्यांचा स्वत:वर विश्वास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सुनील नरेन,
कुलदीप यादव किंवा कुल्टन नाईल आपल्या रनअपसाठी तयार होतील, त्या वेळी कुठलेही दडपण न बाळगणे आवश्यक आहे.
गुणतालिकेत सध्या जे दिसत आहे त्या तुलनेत दिल्ली संघ सरस असल्याची सर्वांनाच कल्पना आहे. दिल्ली संघाने अन्य संघांच्या तुलनेत काही लढती कमी खेळल्या आहेत आणि ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आता दिल्ली
संघाने वादळाचे रूप धारण करण्याची गरज आहे. (टीसीएम)