युवा खेळाडू ‘दम’ दाखविणार!

By admin | Published: January 26, 2017 01:18 AM2017-01-26T01:18:21+5:302017-01-26T01:18:21+5:30

कसोटी आणि वन डे मालिकेत विजय मिळविणारा भारतीय संघ युवा खेळाडूंच्या बळावर आजपासून सुरू होत असलेली तीन टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज

Youngsters will show 'Dum'! | युवा खेळाडू ‘दम’ दाखविणार!

युवा खेळाडू ‘दम’ दाखविणार!

Next

कानपूर : कसोटी आणि वन डे मालिकेत विजय मिळविणारा भारतीय संघ युवा खेळाडूंच्या बळावर आजपासून सुरू होत असलेली तीन टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. इंग्लंडवर वर्चस्व गाजविण्यासाठी टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून ‘दमदार’ कामगिरी अपेक्षित आहे.
भारताने वन डेच्या तुलनेत टी-२० साठी वेगळाच संघ निवडला. रिषभ पंत, मनदीप सिंग, यजुवेंद्र चहल, परवेझ रसूल, सुरेश रैना आणि आशिष नेहरा हे वन डे संघात नव्हते. आश्विन आणि जडेजा या स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यामुळे रसूल आणि अमित मिश्रा यांना गोलंदाजीत संधी असेल. स्थानिक सामन्यात देखणी कामगिरी करणारा १९ वर्षांचा रिषभ पंत याने प्रथमच राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. दिल्लीच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाने मागच्या वर्षी १९ वर्षांखालील विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती.
शिखर धवन नसल्यामुळे लोकेश राहुलसोबत पंत किंवा मनदीप यापैकी एकाला सलामीला येण्याची संधी असेल. पंतचा फॉर्म पाहता त्याच्याकडे डोळेझाक करता येणार नाही. स्थानिक खेळाडू असलेल्या रैनाने अखेरचा टी-२० सामना मार्चमध्ये विश्वचषकात खेळला होता. कोहली, युवराज आणि धोनी हे तिसऱ्या ते पाचव्या स्थानावर फलंदाजीला येतील. सहाव्या स्थानासाठी मनीष पांडे याच्याकडून रैनाला आव्हान राहील.
कोहली गोलंदाजीचे नियोजन कसे करतो हे पाहणे देखील रंजक ठरेल. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि अनुभवी नेहरा हे वेगवान मारा करू शकतात. फिरकीसाठी मिश्रा आणि चहल तसेच रसूल यापैकी पर्याय आहेत. दवबिंदूंचा धोका टाळण्यासाठी सामन्याची सुरुवात सायंकाळी ४.३० पासूनच होणार आहे. वन डे मालिकेसारखाच धावांचा पाऊस या झटपट मालिकेतही पाहायला मिळेल, अशी आशा बाळगण्यात येत आहे. दुसरीकडे वन डे मालिका खेळणारा इंग्लंड संघ टी-२० साठी कायम आहे. वेगवान गोलंदाज टायमल मिल्स हा एकमेव नवा चेहरा असेल.
यॉर्कशायरचा २४ वर्षांचा मिल्स टी-२० तज्ज्ञ मानला जातो. कोलकाता वन डे जिंकल्याने इंग्लंड संघात चैतन्याचा संचार झाला. सलामीचा जेसन रॉय, कर्णधार इयान मोर्गन हे फलंदाजीत तरबेज असून, गोलंदाजीची धुरा जॅक बॉल, डेव्हिड विली हे सांभाळतील. (वृत्तसंस्था)
रसूल, चहलला संधी : कोहली
परवेझ रसूल आणि यजुवेंद्र चहल यांना टी-२०तील तज्ज्ञ खेळाडू बनण्याची ही संधी असल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. आयपीएलमध्ये या दोन्ही खेळाडूंचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीने आश्विन आणि जडेजा या दोघांच्या अनुपस्थितीचा लाभ घेत या दोघांनी स्वत:ला फिरकी गोलंदाजीत सिद्ध करावे, असे आवाहन केले.
ज्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले, त्यांनी आयपीएल तसेच स्थानिक सामन्यांत चमकदार कामगिरी केली आहे. हे खेळाडू प्रतिभावान असल्याने त्यांनी टी-२०तही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्यावी. चहल आणि रसूल माझ्या नेतृत्वात खेळले आहेत. दोघेही शिताफीने गोलंदाजी करतात. काही निर्धाव चेंडू टाकून ते फलंदाजांवर दडपणदेखील आणू शकतात. यामुळे विकेट मिळण्याची शक्यता निर्माण होते, असे कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आत्मविश्वास संचारला : मोर्गन
भारताविरुद्ध कोलकाता वन डे जिंकल्यामुळे संघात आत्मविश्वासाचा संचार झाल्याचे मत इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन याने व्यक्त केले. टी-२० आत्मविश्वास फार आवश्यक असल्याचे सांगून मोर्गन पुढे म्हणाला , ‘खेळाडूंना सूर गवसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एका विजयानंतर टी-२० मालिका जिंकण्याची जिद्द निर्माण झाली.’
जूनमध्ये आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेत आम्हा गोलंदाजांना लय शोधणे कठीण होत होते. पण टी-२० द्वारे गोलंदाज पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकतात. विजयाला आम्ही प्राधान्य दिले असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत दरारा निर्माण करणे गरजेचे आहे. कौशल्याचा आपण कसा वापर करतो, यावर विजयाचे समीकरण विसंबून असल्याचे मोर्गनचे मत आहे.
धोनीने केला यॉर्करचा सराव
कधीकाळी चॅम्पियन फिनिशर समजला जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याने डेथ ओव्हरमध्ये यॉर्करवर धावा कशा काढायच्या याचा सराव केला. ग्रीन पार्कवर यॉर्करतज्ज्ञ जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर सराव केला. त्याने वाईड यॉर्कर टाकण्याची बुमराहला सूचना केली. त्यावर धुवाधार फटकेबाजीदेखील केली.
मिल्सच्या वेगाची भीती नाही!
इंग्लंड संघात आलेला वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या ९० किमी प्रतिताशी वेगामुळे मी भयभीत नाही. मी त्याला गोलंदाजी करताना पाहिले नाही; पण ९० पेक्षा अधिक वेगवान मारा आधीही खेळलो आहे. आम्हाला मिल्सचा मारा खेळण्यात कुठलाही अडसर जाणवणार नाही, असे विराट कोहली म्हणाला.
‘मोर्गनला भावली ई-रिक्षा!
इंग्लिश कर्णधार इयान मोर्गन याला कानपूरच्या रस्त्यावर धावणारी ई-रिक्षा फारच आवडली. त्याने रिक्षातून शहराचा फेरफटका मारण्याची इच्छा व्यक्त केली. सुरक्षेच्या कारणास्तव मात्र हॉटेल परिसरात त्याला ई-रिक्षाची फेरी मारण्याचा आनंद घेता आला.
काल सराव संपल्यानंतर बसमधून परतताना मोर्गनने रस्त्यावर रिक्षा पाहिली. त्याने मोबाईलमध्ये फोटो घेत रिक्षाबद्दल जाणून घेतले. नंतर फिरण्याची इच्छा बोलून दाखविली. स्थानिक पोलिसांनी त्याला बाजारात फिरण्याची परवानगी नाकारताच हॉटेल व्यवस्थापनाच्या परवानगीने त्याला हॉटेल परिसरात ई-रिक्षाने फिरविण्यात आले.
इंग्लंडच्या खेळाडूंना येथे बनलेल्या चामड्याच्या वस्तू फारच आवडल्या. त्यांनी पोलिसांच्या सुरक्षेत बाजारात जाऊन वस्तू खरेदी केल्या. काहींनी जिम आणि जलतरणाचा आनंद लुटला.

Web Title: Youngsters will show 'Dum'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.