त्रिमुर्तीला धक्का, शास्त्री निवडणार आपला आवडता सपोर्ट स्टाफ
By admin | Published: July 14, 2017 11:18 AM2017-07-14T11:18:35+5:302017-07-14T11:18:35+5:30
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच आता सपोर्ट स्टापच्या निवडीवरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच आता सपोर्ट स्टापच्या निवडीवरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. काल बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.
त्रिर्मुर्तीने निवडलेल्या सहयोगी स्टाफवर प्रशासनिक समितीने (COA) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले. त्यामुळे तिमुर्तीने निवड केलेल्या सपोर्ट स्टापवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सीएसीने झहीरच्या नावाला संमती दिली. याचा अर्थ गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसावे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला २५० दिवस देण्याची अट आहे. झहीर इतका वेळ देऊ शकणार नाही, असे कळते. झहीर १०० दिवसांच्या वर उपलब्ध राहणार नाही. इतकेच नव्हे तर झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही.
गोलंदाजी प्रशिक्षकाऐवजी झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करावी अशी शास्त्रींची भूमिका आहे. झहीरकडे भरपूर माहिती आहे पण कोचिंगचा अनुभव नाही. झहीरच्या तुलनेत भारत अरुण यांच्याकडे गोलंदाजीतल्या ज्या तांत्रिक गोष्टी, बारकावे आहेत त्याचा अनुभव जास्त आहे असे शास्त्री यांचे मत आहे. झहीर संघाला वर्षातले 250 दिवस देऊ शकतो का ? ही शास्त्री यांना चिंता आहे. त्याने नेटमध्ये येऊन अरुण यांना सहाय्य करावे असे शास्त्री यांना वाटते.
सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) ९ जुलै रोजी मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. कुठलेही मानधन न घेता हे काम केल्यामुळे बीसीसीआयने सीएसीचे आभार मानले. बीसीसीआयने म्हटले आहे की,ह्यक्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांचे आभारी आहोत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सहर्ष सहमती दर्शवली. समितीच्या तिन्ही सदस्यांनी पारदर्शिता व प्रतिबद्धतेसह आपली जबाबदारी निभावली.
सीएसीने व्यक्त केली राय यांच्याकडे नाराजी - क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गुरुवारी सीओए प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून नुकताज भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदांवर कलेल्या निवडीबाबत आपली नाराजी कळवली. ‘राहुल द्रविड आणि झहीर खान यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यावर लादण्यात आली आहे असे दृश्य सध्या उभे केले जात आहे,’ असे सीएसीने या पत्रात म्हटले आहे. सीएसीला केवळ मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे हक्क असताना त्यांनी त्यापलीकडे जाऊन राहुल द्रविड आणि झहीर खान यांचीही सल्लागार म्हणून निवड केली.
कोण आहे भरत अरुण -
अरुण हे २०१४ पासून गोलंदाजी कोच होते. २०१६ ला शास्त्री यांना बाहेर करेपर्यंत ते संघासोबतच होते. अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नाही; पण उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८० च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत. शास्त्री यांच्या शिफारशीवरुन तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अरुण यांना सिनियर संघाचे गोलंदाजी कोच बनविले. त्या वेळी अरुण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्यरत होते