युथ आॅलिम्पिक : मिझोरमच्या भारोत्तोलकाने मिळवून दिले पहिले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:47 AM2018-10-10T05:47:10+5:302018-10-10T05:47:28+5:30

भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला.

 Youth Olympics: First gold in Mizoram's weightlifting | युथ आॅलिम्पिक : मिझोरमच्या भारोत्तोलकाने मिळवून दिले पहिले सुवर्ण

युथ आॅलिम्पिक : मिझोरमच्या भारोत्तोलकाने मिळवून दिले पहिले सुवर्ण

Next

ब्यूनस आयर्स : भारोत्तोलक जेरेमी लालरिनुंगाने युथ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. पुरुषांच्या ६२ किलो वजनगटात तो अव्वल राहिला. त्याचप्रमाणे १६ वर्षीय नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण वेध घेतला.
आयझोलच्या १५ वर्षीय जेरेमीने २७४ किलो (१२४ व १५०) वजन पेलले. त्याने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक पटकावले होते. तुर्कीच्या तोपटास कानेरने २६३ किलो वजन उचलताना रौप्यपदक पटकावले. कोलंबियाचा विलार एस्टिवन जोस कांस्यपदकाचा मानकरी ठरला. या महिन्यात २६ तारखेला वयाची १६ वर्षे पूर्ण करणार असलेल्या जेरेमीने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये (युथ) रौप्य आणि कांस्य (ज्युनिअर) पदक पटकावले होते.
मिझोरम भारोत्तोलन संघटनेचे अध्यक्ष एन. थांगचुंगनुंगा म्हणाले,‘जेरेमीचे वडील लालनेइतलुंगा माजी बॉक्सर असून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविली आहेत.’ जेरेमीचीही बॉक्सर होण्याची इच्छा होती, पण प्रशिक्षकांच्या सल्ल्याप्रमाणे त्याने भारोत्तोलनामध्ये पदार्पण केले. त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी २०११ मध्ये सैनिक क्रीडा संस्थेने त्याची निवड केली होती.
या पदकामुळे भारताची युथ आॅलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी निश्चित झाली आहे. भारताने यापूर्वीच चार पदके पटकाविली आहेत. शाहू तुषार माने आणि मेहुली घोष यांनी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रौप्य तर ज्युडोमध्ये टी तबाबी देवीने ४४ किलो गटात दुसरे स्थान पटकावत भारताला प्रथमच पदक मिळवून दिले. (वृत्तसंस्था)

नेमबाजीत मनू भाकरचा सुवर्णवेध
युवा नेमबाज मनू भाकरने अपेक्षित कामगिरी करताना मंगळवारी युथ ओलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. तिने २३६.५ गुणांचा वेध घेतला. यासह तिने आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अपयश मागे टाकले. मनूच्या वर्चस्वापुढे इयाना इनिना व निनो खुत्सबरिद्ज या रशियन खेळाडूंनी रौप्य व कांस्य पदक जिंकले.

२०१४ भारताने मध्ये नानजिंग युथ आॅलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले होते तर २०१० सिंगापूर स्पर्धेत सहा रौप्य व दोन कांस्यपदके पटकाविली होती. भारोत्तोलनमध्ये महिला विभागात ४८ किलो वजन गटात स्नेहा सोरेन पाचव्या स्थानी राहिली.

Web Title:  Youth Olympics: First gold in Mizoram's weightlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.