यूथ आॅलिम्पिक : सौरभ चौधरीचे सुवर्ण यश; दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात गोल्डन नेम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:23 AM2018-10-11T02:23:43+5:302018-10-11T02:24:16+5:30
सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
ब्युनासआयर्स : सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. १६ वर्षांच्या सौरभने २४४.२ गुणांची कमाई केली. त्याने द. कोरियाचा सुंग युन्हो (२३६.७) आणि स्वित्झर्लंडचा सोलारी जेसन (२१५.६) यांना मागे टाकले. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सौरभने दहापेक्षा अधिक गुणांची १८ वेळा नोंद केली.
आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनियर आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिोमध्ये सुवर्ण विजेत्या राहीलेल्या सौरभने पात्रता फेरीतही ५८० गुणांसह अव्वल स्थान पटकविले होते. काल १६ वर्षांच्या मनू भाकरने महिलांच्या पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकले होते. सुरुवातीला दहापेक्षा कमी गुण चारवेळा घेणाऱ्या सौरभने आघाडी कायम राखली. त्याने १०.७, १०.४, १०.४ आणि १०.० गुणानसह वर्चस्व राखले. दरम्यान जेसन आणि युन्होकडून त्याला कडवे आव्हान मिळाले. आधी जेसन आघाडीवर होता. युन्होने त्याला मागे टाकले. सौरभने मधल्या कायात आघाडी कायम राखली होती.
चार दिवसात चौथ्यांदा भारताच्या नेमबाजांनी पदक जिंकले आहे. शानू माने आणि मेहली घोष यांना रौप्य पदक मिळाले होते. सौरभने मागच्या महिन्यात झालेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजीत एअर पिस्तुलमध्ये विश्व विक्रमासह सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पाचवा भारतीय नेमबाज ठरला. (वृत्तसंस्था)
अर्चना कामत पराभूत
टेबल टेनिसमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. स्पर्धेत शानदार वाटचाल केलेल्या अर्चना कामतची लक्षवेधी आगेकूच अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आली. चीनच्या दुसºया मानांकीत यिंगशा सुनविरुद्ध १-४ असा पराभव झाल्याने अर्चनाला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला.
दरम्यान, अर्चना उपांत्य फेरीत पराभूत झाली असली, तरी तिला स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. यासाठी तिला रोमानियाच्या आंद्रिया ड्रगोमनच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उपांत्य फेरीआधी अर्चनाने उपांत्यपूर्व फेरीत रंगलेल्या ७ गेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत बाजी मारली. यावेळी तिने अझरबैझानच्या नाइन जिंगचा १३-११, ८-११, ६-११, ११-३, ६-११, १२-१०, ११-७ असा पराभव केला.