युवा खेळाडूंनी वेधले लक्ष
By admin | Published: August 21, 2015 10:44 PM2015-08-21T22:44:42+5:302015-08-21T22:44:42+5:30
स्टार स्पोर्ट्सच्या प्रो-कबड्डीचा दुसरा टप्पा अनेक अर्थांनी यशस्वी झाला. कामगिरी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, मॅटवरील थरार यासारखी प्रत्येक बाब
गौतमी अरोसकर लिहितो...
स्टार स्पोर्ट्सच्या प्रो-कबड्डीचा दुसरा टप्पा अनेक अर्थांनी यशस्वी झाला. कामगिरी, प्रेक्षकांचा प्रतिसाद, मॅटवरील थरार यासारखी प्रत्येक बाब पहिल्या टप्प्याच्या तुलनेत एक पाऊल पुढे असल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या मोसमात युवा खेळाडूंची संख्या अधिक आहे, ही बाब माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. त्यात काही खेळाडूंनी माझे लक्ष वेधले असून या यादीमध्ये अग्रक्रमावर तेलुगू टायटनचा संदीप आहे. तो केवळ १८ वर्षांचा असून डावा कोपरा सांभाळतो. तो हरियाणाचा असून यंदाच्या मोसमात उत्तम बचावपटूंपैकी एक आहे. लीगनंतर त्याचा आत्मविश्वास अधिक उंचावला ही चांगली बाब आहे. पाटणा पायरेट््सचा गुरुविंदरसिंग दुसरा लक्षवेधी खेळाडू आहे. तो चढाई करणारा असून, चमकदार कामगिरीने त्याने सर्वांचे लक्ष वेधले. केवळ राकेशच्या अनुपस्थितीमुळे गुरुविंदरला संधी मिळाली आणि त्याने तिचे सोने करताना आज सर्वोत्तम चढाई करणारा खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली. केवळ २० वर्षांचा असलेल्या गुरुविंदरचे भवितव्य उज्ज्वल आहे.
बंगळुरू बुल्समध्ये केवळ १८ वर्षांचे दोन खेळाडू असून, आतापर्यंत त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. प्रदीप नरवाल आणि आशिष छोकर यांच्या जोडीमुळे बंगळुरूमध्ये असलेल्या गुणवत्तेची प्रचिती येते. संघाच्या यशात या युवा खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा आहे. यू मुम्बाकडून खेळणारा कर्णधार अनूपचा भाऊ प्रदीपकुमार याचीसुद्धा कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. मुंबई संघाने यंदाच्या मोसमात लौकिकाला साजेशी कामगिरी करताना दखल घेण्यास भाग पाडले. दबंग दिल्लीचा रोहित कुमार चौधरी शानदार खेळाडू ,असून त्याने या मोसमाची चमकदार सुरुवात केली. स्पर्धेबाबत विचार करता, दिल्ली दबंगचा काशिलिंग अडके लीगमध्ये सर्वोत्तम चढाई करणारा खेळाडू भासत आहे. एका लढतीत त्याने चढाई करताना मिळविलेले २४ गुण हा या स्पर्धेचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
छाप पाडणारा दुसरा खेळाडू यू मुम्बाचा रिशांक देवडिगा हा केवळ २१ वर्षांचा आहे; पण त्याने जबाबदारी स्वीकारताना अनूपला योग्य साथ देऊन चमकदार कामगिरी केली आहे. मुंबई संघ ‘करा अथवा मरा’ स्थितीत त्याचा चढाईपटू म्हणून वापर करतो हा या युवा खेळाडूसाठी मोठा बहुमान आहे. खेळातील डावपेच आणि नियम यांची सखोल माहिती असल्याची प्रचिती यंदाच्या स्पर्धेत येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बराच बदल झाल्याचे निदर्शनास येते. बचावपटूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे चढाई करणाऱ्या खेळाडूंना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. ‘जिंकू किंवा मरू’ अशा आशयाच्या अनेक चढाया अनुभवायला मिळत आहेत.
अखेर स्टार स्पोर्ट््सचे त्यांच्या अनोख्या ‘ले पंगा’ जाहिरातीबाबत कौतुक करायलाच पाहिजे, कारण त्यात काही तरी वेगळेपण आहे. ते कबड्डीशी निगडित असून युवकांना आकर्षित करणारे आहे. ‘पंगा’ हा
शब्द युवा पिढीमध्ये चपखल बसतो आणि त्यामुळे या खेळातील जोश दिसून येतो. (टीसीएम)