युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

By Admin | Published: April 18, 2017 02:07 AM2017-04-18T02:07:27+5:302017-04-18T02:07:27+5:30

आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे

Youthful Indian athletes | युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

युवा भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी

googlenewsNext

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
आयपीएलचे दहावे सत्र सुरू होऊन दोन आठवडे झाले, पण अद्यापही कोणता संघ सर्वात पुढे जाईल हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण गुणतालिका बघता मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे टॉप थ्रीमध्ये स्थान टिकवून आहेत. तर रायजिंग पुणे, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे शेवटच्या तीनमध्ये अडकून पडले आहेत. आजच्या घडीचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा आरसीबी संघ गुण तालिकेत तळाला आहे. त्यापाठोपाठ फलंदाजीची मजबूत फळी असणारा सुरेश रैनाचा गुजरातचा संघ शेवटून दोन नंबरवर आहे. त्यानंतर शेवटून तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो तो रायजिंग पुणे संघाचा. या संघात महेंद्रसिंग धोनी, स्टिव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे यासारखे दिग्गज खेळाडू असताना हा संघ फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. याच्यावरून संघाचा बॅलन्स किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. फक्त चांगले गोलंदाज आहेत पण फलंदाजी मजबूत नसेल तर विजय मिळणे कठीण जाते. तसेच तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील आणि गोलंदाजांची वानवा असेल तर तुम्ही जिंकू शकत नाही. आपण पाहिले आहे की, विराट कोहली, ए.बी. डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन हे दोघे चांगले खेळत असूनही संघ जिंकू शकत नाही. आयपीएलमधील सगळे संघ जवळ जवळ समान पातळीवरचे आहेत. एखाद्या संघाला थोडा जरी फायदा मिळाला तर तो सामना आपल्या खिशात घालतो. मला यंदा दोन संघांनी सगळ्यात जास्त इम्प्रेस केले आहे, ते म्हणजे, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, तर दिल्लीचे सगळेच खेळाडू चमकदार परफॉर्मन्स देत आहेत. मॅक्सवेल, पोलार्ड, बेन स्टोक्स, डेव्हिड वॉर्नर यासारख्या परदेशी खेळाडूंनी आपआपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली असता मुंबई इंडियन्सच्या नितीश राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यात त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे. तो बेडरपणे खेळतो, त्याच्या फटक्यांचे टायमिंग चांगले आहे. शिवाय फटक्यात ताकद असल्याने धावांची थैली भरत आहे. त्याच्याशिवाय हार्दिक आणि कुणाल पांड्या हे दोघेही मुंबईसाठी चांगला खेळ करीत आहेत. भारतीय गोलंदाजांचा विचार करता फिरकी गोलंदाज विशेषत: यजुवेंद्र चहल हा चांगली कामगिरी करीत आहे. भुवनेश्वर कुमारने दहा बळी मिळवून पर्पल कॅप मिळवली आहे. स्विंग हे त्याचे प्रमुख हत्यार आहे, तो इनस्विंग, आऊटस्विंग तर करतोच शिवाय तो लेट स्विंग करण्यात माहिर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपली गती वाढवली आहे. त्यामुळे तो धोकादायक बनला आहे. आॅस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत चांगली कामगिरी करणारा उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे. एकंदरीत अनेक भारतीय खेळाडूंना हे सत्र आतापर्यंत चांगले ठरले आहे. पण भारताचे कोहली, धोनी, रैना यांच्यासारखे स्टार खेळाडू पुढे जाऊन मॅचविनिंग परफॉर्मन्स करतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Title: Youthful Indian athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.