यू मुंबाच्या अग्रस्थानाच्या आशा कायम
By admin | Published: March 2, 2016 02:53 AM2016-03-02T02:53:09+5:302016-03-02T02:53:09+5:30
तुफानी खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य यू मुंबाने तेलगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणताना ३८-२२ असा शानदार विजय मिळविला.
रोहित नाईक, मुंबई
तुफानी खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य यू मुंबाने तेलगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणताना ३८-२२ असा शानदार विजय मिळविला. यासह प्रो कबड्डीच्या तिसऱ्या सत्राच्या गुणतक्त्यात अग्रस्थान मिळविण्याच्या मुंबईच्या आशा कायम असून, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना तळाला असलेल्या दबंग दिल्लीविरुद्ध भिडावे लागेल. याआधी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने झुंजार विजय मिळवताना बंगळुरू बुल्सला २६-२२ असा धक्का देऊन उपांत्य फेरी निश्चित केली. तेलगूच्या पराभवाचा फायदा पुणेकरांना झाला असून, त्यांचीही उपांत्य फेरी निश्चित झाली आहे.
वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये यू मुंबाने आक्रमक खेळाच्या जोरावर एकहाती वर्चस्व राखताना तेलगूला अखेरपर्यंत संधी दिली नाही. रिशांक देवाडिगाने पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमण करताना १४ गुणांची वसुली केली. कर्णधार अनूप कुमारनेही त्याला चांगली साथ दिली. बचावात मोहित चिल्लर, जीवा कुमार यांनी मजबूत पकडी करून तेलगूच्या आव्हानातली हवा काढली.
मध्यंतराला १८-१० असे वर्चस्व राखल्यानंतर यू मुंबाने आणखी वेगवान खेळ करीत आपला हिसका दाखवला. तेलगूवर एकूण ३ लोण चढवून मुंबईकरांनी तुफानी खेळ केला. बाद फेरीसाठी विजय अनिवार्य असलेल्या तेलगूकडून कर्णधार राहुल चौधरीचा अपवाद वगळता एकही खेळाडू चमकला नाही. राहुलने अप्रतिम अष्टपैलू खेळ करताना १२ गुण मिळवताना एकाकी लढत दिली.
तत्पूर्वी, बंगाल वॉरियर्सने अखेरच्या क्षणी खेळ उंचावून बंगळुरू बुल्सचे आव्हान २६-२२ असे परतवून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या बंगालवरील दडपण सुरुवातीपासूनच जाणवत होते. मात्र, कर्णधार नीलेश शिंदेने जबरदस्त पकडी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मध्यंतराला १३-११ अशी आघाडी राखलेल्या बंगालला दुसऱ्या डावात बंगळुरूने चांगलेच झुंजवले.
दीपक कुमार दहियाने खोलवर चढाया करताना बंगालवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नीलेशसह दीपक कुमारने निर्णायक पकडी करून बंगालची उपांत्य फेरी निश्चित केली. त्याचप्रमाणे जँग कुन ली व महेश महेश गौड यांनी आक्रमक चढाया करताना बंगालसाठी चांगली कामगिरी केली.