पायरेट्सला नमवण्यासाठी यू मुंबा सज्ज
By Admin | Published: August 20, 2015 11:30 PM2015-08-20T23:30:58+5:302015-08-20T23:30:58+5:30
सलग दुसऱ्या सत्रात आम्ही बाद फेरीत धडक मारली असून कामगिरीत राखलेले सातत्य कायम ठेवू. उपांत्य सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पटणा
मुंबई : सलग दुसऱ्या सत्रात आम्ही बाद फेरीत धडक मारली असून कामगिरीत राखलेले सातत्य कायम ठेवू. उपांत्य सामन्यात युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या पटणा पायरेट्सचे आव्हान असले तरी त्यांना बाद फेरीत खेळण्याचा अनुभव नसल्याने त्या जोरावर आम्ही बाजी मारु, असे सांगत बलाढ्य यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने प्रो-कबड्डीच्या उपांत्य फेरीसाठी रणशिंग फुंकले आहे.
प्रो-कबड्डीची उपांत्य फेरी गाठलेले चारही संघाच्या कर्णधारांनी या निर्णायक सामन्यासाठी संघाच्या तयारीबाबत माहिती दिली. शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीत पहिली लढत तेलुगू टायटन्स वि. बंगळुरु बुल्स अशी होईल. तर यानंतर यजमान यू मुंबा धोकादायक पटणा पायरेट्स सोबत दोन हात करतील. पटणाच्या खेळामध्ये वेग असून त्यांचा संघ समतोल आहे यात शंका नाही, मात्र उपांत्य सामना खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे नसून आम्ही त्याचा फायदा घेत बाजी मारू, असे अनुपने सांगितले. संघाच्या व्यूहरचनेबाबत अनुप म्हणाला की, आमचा संघ कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाही, हीच आमची खरी ताकद आहे. संघातील सगळे रेडर आणि डिफेंडर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. उपांत्य सामन्यात संघाची आक्रमकता सर्वांनाच दिसून येईल. (क्रीडा प्रतिनिधी)