युकीने काढला पराभवाचा वचपा
By admin | Published: September 27, 2015 12:07 AM2015-09-27T00:07:13+5:302015-09-27T00:07:13+5:30
भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरी याने झेक प्रजासत्ताकचा खेळाडू जिरी वेस्ली याला एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत धूळ चारून डेव्हिस चषकातील पराभवाची परतफेड केली;
काओसियुंग (तैवान): भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरी याने झेक प्रजासत्ताकचा खेळाडू जिरी वेस्ली याला एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य लढतीत धूळ चारून डेव्हिस चषकातील पराभवाची परतफेड केली; शिवाय अंतिम फेरीदेखील गाठली.
युकीने विश्व क्रमवारीत ४० व्या स्थानावरील वेस्लीला ७-६, ६-० ने नमविले. या विजयानंतर युकीच्या खात्यात ७५ गुणांची भर पडली आहे. ही स्पर्धा जिंकल्यास त्याला १२५ गुणांचा लाभ होईल. आघाडीच्या शंभर खेळाडूंवर मिळविलेला युकीचा हा पाचवा आणि अव्वल ५० खेळाडूंवरील एकेरीचा हा दुसरा विजय होता. युकीने चौथ्यांदा चॅलेंजरची अंतिम फेरी गाठली. गतवर्षी त्याने इटलीचा फॅबियो फोगनिनी याला चेन्नई ओपनमध्ये पराभूत केले होते. याशिवाय ६४ व्या स्थानावरील पाब्लो कारिनो आणि ८८ व्या स्थानावरील टोबियस कमाके यांनादेखील युकीने नमविले आहे.
महिनाभरात दुसऱ्यांदा वेस्लीविरुद्ध खेळणाऱ्या युकीने हा सामना १ तास २३ मिनिटांत जिंकला. सामन्यानंतर तो म्हणाला,‘मी दिल्लीत वेस्लीचा खेळ समजून घेतला. मी त्याच्यापुढे भक्कमपणे उभा राहिलो तर जिंकू शकतो याची खात्री पटल्यानंतर तसेच केले.’
दरम्यान, सोमदेव देवबर्मन आणि जीवन नेदुचेझियन या भारतीय जोडीला दुहेरीत तैवानच्या जोडीकडून उपांत्य सामन्यात २-६, ३-६ ने पराभव पत्करावा लागला.(वृत्तसंस्था)