यू मुंबाचा रोमांचक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2016 03:04 AM2016-03-01T03:04:24+5:302016-03-01T03:04:24+5:30
पिछाडीवरून बाजी मारण्यात तरबेज असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला लढवय्या खेळाचे प्रदर्शन करताना पुणेरी पलटणचे कडवे आव्हान ३०-२७ असे रोमांचकरीत्या परतावले.
रोहित नाईक, मुंबई
पिछाडीवरून बाजी मारण्यात तरबेज असलेल्या बलाढ्य यू मुंबाने पुन्हा एकदा आपला लढवय्या खेळाचे प्रदर्शन करताना पुणेरी पलटणचे कडवे आव्हान ३०-२७ असे रोमांचकरीत्या परतावले. यासह मुंबईकरांनी पुणेकरांविरुद्धची अपराजित मालिका कायम ठेवली असून उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक असलेल्या पुणे संघाला आपल्या अखेरच्या सामन्यात बंगालला नमवणे अनिवार्य असेल.
वरळी येथील सरदार वल्लभभाई स्टेडियममध्ये झालेल्या या रोमांचक सामन्यात सुरुवातीपासूनच अटीतटीचा खेळ झाला. पुणेकरांनी हुकमी खेळाडू मनजीत चिल्लरच्या अनुपस्थितीनंतरही दमदार खेळ करताना मुंबईकरांवर दबाव आणला. बचावावर जोर दिलेल्या पुणेरी पलटनने मुंबईच्या प्रमुख आक्रमकांना रोखत वर्चस्व राखले.
मध्यंतराला १२-१२ अशी बरोबरी झाल्यानंतर मुंबईने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली खरी, मात्र त्यांना याचा आनंद फार काळ घेता आला नाही. पुण्याने जबरदस्त मुसंडी मारत २२व्या मिनिटाला मुंबईवर पहिला लोण चढवून १६-१४ अशी आघाडी घेतली. गेल्या काही सामन्यांत मुंबईसाठी निर्णायक ठरणारा रिशांक देवाडिगा या सामन्यात अपयशी ठरल्याने मुंबईकरांच्या कामगिरीवर परिणाम झाला. पुण्याच्या सचिन शिंगाडेने एक, तर कर्णधाराची जबाबदारी सांभाळलेल्या जसमेर सिंग गुलियाने तब्बल ३ सुपर टॅकेल करताना मुंबईची कोंडी केली. सुरेंदर सिंगने आक्रमक चढाया करताना पुण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. १९व्या मिनिटापासून थेट ३७व्या मिनिटांपर्यंत पुणेकरांनी सुपर टॅकल करताना मुंबईवर दबाव टाकला. मात्र ३९व्या मिनिटात रिशांकने बरोबरी साधून दिल्यानंतर लगेच अनुपने केलेल्या निर्णायक चढाईच्या जोरावर मुंबईने पुण्यावर लोण चढवून विजय निश्चित केला.