युवराज, गौतमला करारातून वगळले
By Admin | Published: December 23, 2014 02:06 AM2014-12-23T02:06:46+5:302014-12-23T02:06:46+5:30
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘अ’ श्रेणीत समावेश केला आहे;
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करणारा भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘अ’ श्रेणीत समावेश केला आहे; मात्र सध्या टीम इंडियातून बाहेर असलेले अनुभवी खेळाडू युवराज सिंह, गौतम गंभीर यांना नव्या करारातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे़
बीसीसीआयने फिरकी गोलंदाज हरभजनसिंहसह वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान यांना ताज्या करारात स्थान दिलेले नाही़ बीसीसीआयने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, उपकर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि आॅफ स्पिनर आऱ अश्विन यांचा ‘अ’ श्रेणीतील करार कायम राखला आहे़ गत वर्षीच्या ‘अ’ श्रेणीत पाचवा खेळाडू सचिन तेंडुलकर याचा समावेश होता; मात्र आता तो निवृत्त झाल्यामुळे त्याची जागा आता भुवनेश्वरने घेतली आहे़
गतवर्षी युवराज आणि गंभीरचा ‘ब’ श्रेणीत समावेश होता; मात्र सलग फ्लॉप ठरल्यामुळे त्यांना बीसीसीआय करारात स्थान मिळू शकले नाही़ इंग्लंड दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा आणि बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला भुवनेश्वर ‘अ’ श्रेणीचा दावेदार होता़
बीसीसीआयच्या ‘ब’ श्रेणीत मुरली विजय, रवींद्र जडेजा, शिखर धवन, रोहित शर्मा यांच्यासह अम्बाती रायडू यांचा समावेश आहे, तसेच वेगवान गोलंदाज मोहंमद शमी आणि अजिंक्य रहाणे यांनाही ‘ब’ श्रेणीत जागा मिळाली आहे़
जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू क्रिकेटपटू परवेज रसूल याचा ‘क’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे़
बंगालचा फलंदाज मनोज तिवारी, पंकज सिंह, मोहित शर्मा, वरुण अॅरोन यांचाही ‘क’ श्रेणीत समावेश आहे़ (वृत्तसंस्था)