युवराजने पाकिस्तानविरोधातील खेळी कॅन्सर पीडितांना केली समर्पित
By admin | Published: June 5, 2017 10:49 AM2017-06-05T10:49:14+5:302017-06-05T10:49:14+5:30
पाकिस्तानविरोधात तुफानी खेळी करत विजयात महत्वाचा वाटा उचलणा-या युवराज सिंगने आपली खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 5 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानविरोधात खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत विजयात महत्वाचा वाटा उचलणा-या युवराज सिंगने आपली खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली आहे. सराव सामन्यावेळी आजारी असलेल्या युवराज सिंगची तब्बेत पहिल्या सामन्याआधी ठणठणीत झाली. मात्र यामुळे पाकिस्तानची तब्बेत मात्र पुरती बिघडली. युवराजने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 32 चेंडूत 53 धावा केल्या. युवराज सिंगच्या खेळीमुळे पाकिस्तानची मात्र चांगलीच दमछाक झाली.
युवराज सिंगने आपल्या या खेळीवर आनंद व्यक्त केला. पाकिस्तानविरोधात मी चांगलं प्रदर्शन दाखवू शकलो याचा मला आनंद असल्याचं त्याने सांगितलं. तसंच युवराजने आपली ही तुफानी खेळी कॅन्सर पीडितांना समर्पित केली. यावेळी त्याने लंडन दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांनाही आदरांजली वाहिली. युवराजने संघाला चांगली सुरुवात करुन देणारी सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनचंही कौतुक केलं.
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर विराट कोहलीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी विराटने सांगितलं की, "युवराज सिंगच्या आधी आमच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. मी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही बाबतीत समाधानी आहे. आमच्या फलंदाजांनी चांगली खेळी केली, तसंच गोलंदाजांनीही चांगलं प्रदर्शन केलं. मला वाटतं क्षेत्ररक्षणात मात्र आम्ही कमी पडलो. फलंदाजी आणि गोलंदाजीला मी 10 पैकी 9 गुण देतो, पण क्षेत्ररक्षणात फक्त 6 गुण देईन. येणा-या पुढील सामन्यांमध्ये आम्ही क्षेत्ररक्षणात सुधार करु".