युवराज प्रेक्षकांना मैदानाकडे ओढतो
By admin | Published: December 23, 2015 11:41 PM2015-12-23T23:41:51+5:302015-12-23T23:41:51+5:30
युवराजसिंग याला भारतीय टी-२० संघात स्थान दिल्याचे माजी कर्णधार कपिलदेव याने स्वागत केले. युवी हा मॅकेन्रो आणि मॅराडोनासारखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून तो गर्दी खेचणारा रोमांचक
नवी दिल्ली : युवराजसिंग याला भारतीय टी-२० संघात स्थान दिल्याचे माजी कर्णधार कपिलदेव याने स्वागत केले. युवी हा मॅकेन्रो आणि मॅराडोनासारखा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून तो गर्दी खेचणारा रोमांचक खेळाडू असल्याचे कपिलचे मत आहे.
विजय हजारे करंडकात चमकदार कामगिरी करणाऱ्या युवीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी टी-२० संघात स्थान मिळाले आहे. युवीचे कौतुक करीत एका कार्यक्रमात बोलताना कपिल म्हणाला, ‘जॉन मॅकेन्रो आणि दिएगो मॅराडोना यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानावर यायचे. युवराज असाच रोमहर्षक खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानावर येतात. युवीची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे अनेक जण ‘फॅन’ आहेत. तो मॅचविनरदेखील आहे. त्याला स्वत:वर किती भरवसा आहे, यावर पुढील यश अवलंबून असेल. तो पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो.’
कपिल म्हणाला, ‘विराट हा फलंदाज असूनही वेगवान गोलंदाजासारखा आक्रमक आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमकपणा चेहऱ्यावर झळकायला हवा. आधीच्या संघात हा आक्रमक भाव नव्हता.
सौरभ गांगुली याने सुरुवात केली. बंगाली असल्यानंतरही तो आक्रमक होता हे विशेष.’
मोहम्मद शमी फिट झाल्यानंतर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत कपिल म्हणाला, ‘जखमेतून सावरल्यानंतर तो पुनरागमन करीत असल्याने निश्चितपणे प्रभावी ठरेल. अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू कुठल्याही परिस्थितीशी एकरूप होऊ शकतो, हे त्याच्या खेळातून स्पष्ट झाले. हळूहळू तो मुरब्बी खेळाडू होत असल्याचा कपिलने आवर्जून उल्लेख केला.’ (वृत्तसंस्था)