युवराज सिंग, आशिष नेहराचे पुनरागमन

By Admin | Published: January 7, 2017 04:23 AM2017-01-07T04:23:33+5:302017-01-07T04:23:33+5:30

धोनीने अचानकपणे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे भारताची धुरा सोपविली.

Yuvraj Singh, Ashish Nehra's comeback | युवराज सिंग, आशिष नेहराचे पुनरागमन

युवराज सिंग, आशिष नेहराचे पुनरागमन

googlenewsNext


मुंबई : महेंद्रसिंग धोनीने अचानकपणे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीकडे भारताची धुरा सोपविली. शुक्रवारी मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे स्टार अष्टपैलू युवराज सिंग आणि अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांचे संघात झालेले पुनरागमन लक्षवेधी ठरले.
आगामी १५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड करताना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली याची भारताच्या कर्णधारपदी अधिकृत निवड केली. त्याचवेळी युवराज आणि नेहरा यांची झालेली निवड लक्षवेधी ठरली. त्याचप्रमाणे, दिल्लीचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतची टी-२० संघात वर्णी लागली. यासह राष्ट्रीय निवड समितीने एकप्रकारे धोनीनंतरच्या पर्यायाचा एकप्रकारे संकेत दिला, तर तब्बल नऊ वर्षांहून अधिक काळ भारताचे नेतृत्व सांभाळलेला धोनी यष्टीरक्षक - फलंदाज म्हणून संघात कायम आहे.
दुसरीकडे भरवशाचा मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला टी-२० संघात स्थान मिळाले नसले तरी एकदिवसीय संघात मात्र त्याने आपली जागा कायम राखली आहे. युवा रिषभ पंतला टी-२० संघात रहाणेच्या जागी निवडण्यात आले आहे. तसेच स्टार सुरेश रैनाची टी-२० संघात वर्णी लागली असून, एकदिवसीय संघातून मात्र त्याला वगळण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारताला आगामी १५ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धची एकमेव एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यामुळेच निवडकर्त्यांनी रहाणे व रैना व्यतिरिक्त जवळपास सर्व प्रमुख संघांना दोन्ही संघांमध्ये स्थान दिले आहे.
अव्वल फिरकी गोलंदाजी जोडी रवीचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांना दोन्ही संघांत स्थान मिळाले, तर दुखापतीतून सावरलेला ‘गब्बर’ शिखर धवनची एकदिवसीय संघात वर्णी लागली आहे. टी-२० संघामध्ये धवनला पर्याय म्हणून पंजाबच्या मनदीप सिंगची निवड झाली आहे. लोकेश राहुलसह तो डावाची सुरुवात करू शकतो. उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह यांच्याकडे भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सोपविण्यात आली आहे. या त्रयीला अष्टपैलू हार्दिक पांड्याची मदत मिळेल. तसेच, एकदिवसीय संघात अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राला स्थान मिळाले असून, टी-२० संघात त्याच्या जागी युवा लेगस्पिनर युजवेंद्र चहलची निवड झाली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
>संघनिवडीआधी
कोहलीशी चर्चा
एकदिवसीय व टी-२० भारतीय संघाची निवड करण्याआधी आम्ही कर्णधार विराट कोहलीशी स्काइपवरून संपर्क केला, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले. ‘कोहलीसह केलेल्या चर्चेनंतर आम्ही सर्वोत्तम संघाची निवड केली. दोन्ही संघांची निवड करताना समितीने आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले’, असेही प्रसाद यांनी सांगितले. युवराजच्या निवडीबाबत प्रसाद म्हणाले की, ‘ज्या प्रकारे देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवराजने प्रदर्शन केले त्याकडे पाहून आपल्याला त्याला पाठिंबा द्यायला हवे. त्याने खूप चांगली कामगिरी केली.’
>संघ निवडीला तीन तास विलंब!
सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना बीसीसीआयने ताठर भूमिका घेत भारतीय संघ निवड तीन तास रोखली. निवड समिती बैठकीसाठी लोढा पॅनलकडून लेखी परवानगी मागताच संघ निवड तब्बल तीन तास उशिरा करण्यात आली.
बोर्डाचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी सीईओ राहुल जोहरी यांना विचारणा केली की, बोर्डाच्या नियमानुसार बैठक बोलविण्याचा अधिकार मला आहे पण स्वत: मला माहिती देण्यात आली नाही. यावर लोढा समितीचे सचिव गोपाल शंकरनारायण यांनी जोहरी यांना जो ई-मेल पाठविला त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या २ आणि ३ जानेवारीच्या आदेशान्वये संयुक्त सचिव अमिताभ चौधरी हे बैठक बोलविण्यास अपात्र ठरतात आणि अजय शिर्के यांची न्यायालयाने हकालपट्टी केली आहे. अमिताभ चौधी यांना बैठक बोलविण्याचा कुठलाही अधिकार नाही. ते बीसीसीआयचे कामकाज पाहू शकणार नाहीत. तुम्ही निवड समिती बैठक बोलवू शकता, असे स्पष्ट केले,’
ठरल्यानुसार संघ निवडीसाठी दुपारी १२.३० ला बैठक सुरू होणार होती; पण अधिकाऱ्यांनी लॉजिस्टिकमुळे तसेच पाच निवडकर्ते हजर नसल्याचे कारण दिले. दुपारी १.३३ वाजता जोहरी यांनी शंकरनारायण यांना ई-मेल पाठविला त्यावर निर्णय येताच बैठक पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
त्याआधी अमिताभ चौधरी यांनी मी राज्य संघटनेचा नऊ वर्षे पदाधिकारी राहिलो, पण बोर्डात नऊ वर्षे अद्याप पूर्ण व्हायची असल्याचा युक्तिवाद करीत बैठक बोलविण्याचा अधिकार प्रदान करण्याची मागणी जोहरी यांच्याकडे केली होती.
>भारतीय संघात झालेल्या निवडीनंतर मी आनंदी आहे. मी जास्त विचार करीत नसून, सध्या माझ्या झालेल्या निवडीचा आनंद घेत आहे. मी तंदुरुस्ती, फलंदाजी आणि यष्टीरक्षणावर लक्ष केंद्रित करीत आहे. मोठ्या काळापासून मी धोनीकडून शिकण्याचा प्रयत्न करतोय, पण तो दुसऱ्या संघातून खेळत असल्याने तशी संधी मिळाली नाही. आता मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन धोनीकडून यष्टीरक्षणाचे खूप टीप्स घेण्याचा प्रयत्न करेल. - रिषभ पंत
>युवी - नेहरा लक्षवेधी...
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या युवराजपुढे आता स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान आहे. युवराजने यंदाच्या रणजी मोसमात दमदार कामगिरी करताना पाच सामन्यांत ८४च्या शानदार सरासरीने ६७२ धावा फटकाविल्या. यानंतर त्याने लग्नासाठी ब्रेक घेतला होता. युवीने बडोदाविरुद्ध २६० धावांची तडाखेबंद खेळी केली होती. दुसरीकडे आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीनंतर शस्त्रक्रिया केलेल्या आशिष नेहराचे टी-२० संघात पुनरागमन झाले. त्याचे पुनरागमन भारताकडे चांगल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची असलेली कमतरता स्पष्ट दर्शविते.
>निवडण्यात आलेले भारतीय संघ
एकदिवसीय : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, लोकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.
टी-२० : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मनदीप सिंग, लोकेश राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि आशिष नेहरा.

Web Title: Yuvraj Singh, Ashish Nehra's comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.