अंतिम सामन्यात उतरताच युवराजची विश्वविक्रमाला गवसणी
By admin | Published: June 18, 2017 03:03 PM2017-06-18T15:03:28+5:302017-06-18T15:31:37+5:30
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईला सुरूवात झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
ओव्हल, दि. 18- क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईला सुरूवात झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत या सामन्याला सुरूवात होताच भारताचा डॅशिंग फलंदाज युवराज सिंगने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. आयसीसी स्पर्धेच्याअंतिम सामन्यात सातव्यांदा खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
युवराजच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा व महेला जयवर्धने यांच्या नावावर होता. पाकिस्तान विरोधात मैदानात उतरताच सिक्सर किंग युवराजने सातव्यांदा अंतिम सामन्यात खेळण्याची किमया साधली.
एकदिवसीय कारकिर्दीत युवराजने आतापर्यंत 8622 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 37 इतकी असून त्याने आतापर्यंत 52 अर्धशतक आणि 14 शतक आपल्या नावावर केले आहेत. वन-डेमध्ये 150 धावा ही युवराजची सर्वाधिक धावसंख्या आहे. पाकिस्तानविरूद्धचा हा महामुकाबला म्हणजे युवराजचा 301 वा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करून युवराज भारताला जेतेपद मिळवून देईल अशी अपेक्षा चाहत्यांकडून वर्तवली जात आहे.
भारत-
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान-
सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, जुनेद खान, इमाद वसीम, शादाब खान, फखर जमान.