मूर्ती लहान, कीर्ती महान; जहान हेमराजानी O'pen Skiff Nationals मध्ये अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 05:36 PM2024-02-03T17:36:12+5:302024-02-03T17:39:31+5:30
जहानने जुलै २०२३ मध्ये इटली येथे पार पडलेल्या १२ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना १९वे स्थान पटकावले होते.
मुंबई - सेलिंगमधील उदयोन्मुख खेळाडू जहान हेमराजानी याने मांडवा येथे पार पडलेल्या प्रतिष्ठीत O’pen Skiff Indian राष्ट्रीय सेलिंग अजिंक्यपद स्पर्धेत १२ वर्षांखालील गटाच्या जेतेपदासह खुल्या गटातील सर्वसाधारण जेतेपदाचा मानही पटकावला. ही स्पर्धा O’pen Skiff क्लास असोसिएशन ऑफ इंडिया आणि बॉम्बे सेलिंग असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाच्या स्पर्धकांचा समावेश होता. जहानने अपवादात्मक कौशल्य आणि नवीन युगातील ज्युनियर सेलिंग बोटमधील क्षमता दाखवून सर्वांचे लक्ष वेधले.
जहानने जुलै २०२३ मध्ये इटली येथे पार पडलेल्या १२ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना १९वे स्थान पटकावले होते. त्याने संपूर्ण अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य दाखवून अचूकतेने पाण्यावर नेव्हिगेट केले. संयम आणि अथक समर्पणाच्या जोरावर त्याने प्रबळ दावेदारांमध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
BookMyShow चे संस्थापक आणि सीईओ आशिष हेमराजानी हे जहानचे वडील. समुद्र सफारी हे त्यांचं पॅशन आहे. त्यातूनच जहानला हा खेळ आवडू लागला आणि आता त्याने या खेळामध्ये यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे.
आपल्या प्रशिक्षकांबद्दल आणि त्याच्या शाळेबद्दल जहानने कृतज्ञता व्यक्त केली आहे. "ओपेन स्किफ इंडियन नॅशनल जिंकणे, हे माझं स्वप्न होतं. ते प्रत्यक्षात साकारलं आहे. स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक होती आणि मला दमदार कामगिरी करता आली याचा मला आनंद आहे. हा विजय मला माझी क्षमता उंचावण्यासाठी आणि प्रत्येक शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा देत राहील."
हा विजय जहानच्या उत्कृष्ट क्षमता आणि खेळाप्रती असलेल्या बांधिलकीचा पुरावा आहे. या यशामुळे ओपेन स्किफ सेलिंगच्या जगात एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होत आहे.
उमेशच्या नेतृत्वाखालील २४सेव्हन सेलिंग टीम अंतर्गत जहानने प्रशिक्षण घेतले आणि अमिश वेद यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२३ मध्ये औपचारिकपणे नौकानयन सुरू केले. तो ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीचा विद्यार्थी आहे. स्पर्धेमुळे होत असलेल्या रजेसाठी शाळा त्याला त्याच्या शिक्षणात मदत करत आहे.