झहीरची नियुक्ती फक्त विशेष दौऱ्यांसाठीच
By admin | Published: July 13, 2017 10:28 PM2017-07-13T22:28:47+5:302017-07-13T22:28:47+5:30
भारतीय संघाच्या गोलंदाजी सल्लागारपदी झहीर खानची झालेली नियुक्ती ही राहुल द्रविडप्रमाणेच केवळ विशेष दौऱ्यांसाठी असल्याचे बीसीसीआयने
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - भारतीय संघाच्या गोलंदाजी सल्लागारपदी झहीर खानची झालेली नियुक्ती ही राहुल द्रविडप्रमाणेच केवळ विशेष दौऱ्यांसाठी असल्याचे बीसीसीआयने आज स्पष्ट केले आहे. रवी शास्त्रीच्या नियुक्तीनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या चर्चेवर पडदा पडल्यानंतर झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. त्यामुळे या वादावर पडदा टाकण्यासाठी बीबीसीआयला पुढाकार घ्यावा लागला होता.
अनिल कुंबळेने टीम इंडियाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंनी मोर्चेबांधणी केली होती. पण त्यात सर्वांना पछाडत रवी शास्रीने बाजी मारली होती. मात्र क्रिकेट सल्लागार समितीने मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री याच्या नावावर शिक्कामोर्तब करतानाच राहुल द्रविड आणि झहीर खान यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र या नियुक्तीमुळे रवी शात्री नाराज असल्याचे वृत्त होते. तसेच झहीरऐवजी भारत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी शास्त्री आग्रही होता. तर क्रिकेट सल्लागार समितीचे मत झहीर खानच्या बाजूने होते.
अखेर या वादावर पडदा टाकताना बीसीसीआयने आपले मत स्पष्ट केले. क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकाची निवड करताना पारदर्शकता आणि व्यावसायिकतेचे पालन केले. रवी शास्त्रीची निवड ही त्याच्यातील गुणवत्तेवरून झाली आहे. त्याचे प्रेझेंटेशन आणि दृष्टीकोन संघाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करेल. तसेच राहुल द्रविड आणि झहीर खान यांची मदत परदेश दौऱ्यात गरजेनुसार घेतली जाईल.
झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर शास्त्री यांनी आक्षेप घेतला होता. रवी शास्त्री येत्या सोमवारी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीबरोबर चर्चा करणार असल्याचेही वृत्त होते.
शास्त्री यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण हवे आहेत. भारत अरुण यांच्या निवड व्हावी यासाठी शास्त्री आग्रही आहेत. 2014 ते 2016 दरम्यान शास्त्री संघाचे संचालक असताना भारत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी संभाळत होते. गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सपोर्ट स्टाफ निवडण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते.