झहीरची नियुक्ती ही द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ आहे : बीसीसीआय
By admin | Published: July 14, 2017 12:58 AM2017-07-14T00:58:50+5:302017-07-14T00:58:50+5:30
भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले की, झहीर व द्रविड या दोघांची नियुक्ती नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) ९ जुलै रोजी मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. कुठलेही मानधन न घेता हे काम केल्यामुळे बीसीसीआयने सीएसीचे आभार मानले. बीसीसीआयने म्हटले आहे की,‘क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांचे आभारी आहोत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सहर्ष सहमती दर्शवली. समितीच्या तिन्ही सदस्यांनी पारदर्शिता व प्रतिबद्धतेसह आपली जबाबदारी निभावली.’
बीसीसीआयने पुढे म्हटले की,‘शास्त्री यांच्या नावाची शिफारस त्यांच्या सादरीकरणाच्या आधारावर करण्यात आली. शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्यानंतर सीएसीने त्यांच्या सल्ल्यानंतर विदेश दौऱ्यांसाठी संघाच्या गरजेनुसार फलंदाजी व गोलंदाजी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. सीएसीने केलेल्या कार्याप्रति बीसीसीआय आभार व्यक्त करते. सोमवारी नव्या प्रशिक्षकाची निवड जाहीर करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने स्पष्ट उल्लेख केला होता की, जहीर खान संघाचे पूर्णकालीन गोलंदाजी प्रशिक्षक राहतील. (वृत्तसंस्था)
>सीएसीने व्यक्त केली राय यांच्याकडे नाराजी
क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गुरुवारी सीओए प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून नुकताज भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदांवर कलेल्या निवडीबाबत आपली नाराजी कळवली. ‘राहुल द्रविड आणि झहीर खान यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यावर लादण्यात आली आहे असे दृश्य सध्या उभे केले जात आहे,’ असे सीएसीने या पत्रात म्हटले आहे.
सीएसीला केवळ मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे हक्क असताना त्यांनी त्यापलीकडे जाऊन राहुल द्रविड आणि झहीर खान यांचीही सल्लागार म्हणून
निवड केली.