झहीरचा आंतराष्ट्रीय क्रिकेटला ‘अलविदा’
By admin | Published: October 16, 2015 12:14 AM2015-10-16T00:14:45+5:302015-10-16T00:14:45+5:30
भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला झहीर खान याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सततच्या जखमांमुळे शरीर साथ देत नसल्याची कबुली त्याने दिली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला झहीर खान याने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सततच्या जखमांमुळे शरीर साथ देत नसल्याची कबुली त्याने दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या गावातून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या ३७ वर्षांच्या झहीरची गेल्या तीन-चार वर्षांत राष्ट्रीय संघात ये-जा सुरू होती.
२०११ च्या विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक २१ बळी घेत जेतेपदात मोलाची भूमिका वठविणारा झहीर म्हणाला, ‘‘क्रिकेटमध्ये सर्वांत कठीण निर्णय निवृत्तीचा असतो. तुम्ही ओढूनताणून खेळू इच्छिता; पण एक वेळ अशी येते, की शरीर साथ देत नाही. २०११ च्या विश्वविजेत्या संघाचा खेळाडू असणे आपल्या कारकिर्दीतला सुवर्णक्षण होता. मी क्रिकेटसाठी काही करू इच्छितो; पण सध्यातरी याबाबत निर्णय घेतलेला नाही.’’
कारकिर्दीत प्रोत्साहन देणाऱ्या आणि माझ्या क्षमतेवर विश्वास राखणाऱ्या सर्व कर्णधार आणि कोचेसचा मी आभारी आहे. २००० मध्ये पदार्पण केल्यापासून अनेकांनी मला साथ दिली. त्यांच्या बळावरच मी देशासाठी चांगली कामगिरी करू शकलो. याशिवाय बीसीसीआय, बडोदा, मुंबई, वॉर्सेस्टरशायर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या सर्वांचे मी आभार मानतो.’ कुटुंबीय आणि सहकारी खेळाडूंचे तसेच मातापिता व भाऊ झिशान व अनिस यांचे देखील झहीरने आभार मानले. तो म्हणाला, ‘ड्रेसिंगरूममध्ये मी काही गमतीजमती करीत असल्याने अनेक जण माझे मित्र बनले. याशिवाय गेल्या दोन दशकात डोक्यावर घेणाऱ्या लाखो भारतीय चाहत्यांचादेखील मी ऋणी आहे.’’ (वृत्तसंस्था)
>> झहीर म्हणजे ‘टीम मॅन’ : लक्ष्मण
नवी दिल्ली : ‘ईडन गार्डन्सवर मी कारकिर्दीतील सर्वोच्च २८१ धावांची खेळी केली. यादरम्यान झहीरच्या रूपात मला सर्वांत जवळचा मित्र गवसला,’ असे सांगून झहीरसारखा डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणजे ‘टीम मॅन’ असल्याची भावना व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याने व्यक्त केली.
झहीर हा युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत असल्याचे सांगून लक्ष्मण म्हणाला, ‘‘कारकिर्दीच्या सुरुवातीला कुठल्याही सुविधा नसताना त्याने स्वप्न साकार केले. लहानशा गावापासून सुरू झालेला प्रवास मुंबईतील खडतर स्थितीत न डगमगता सुरूच राहीला; पण सर्वोच्च स्तरावर खेळण्याची भूक कधीही शमली नाही. झहीरमधील हे कर्तृत्व इतरांसाठी रोल मॉडेलसारखेच आहे.’’
झहीरसोबतची मैत्री २००१मधील माझ्या ईडनवरील खेळीपासून सुरू झाल्याचे सांगून लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘‘आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या कसोटीदरम्यान आम्ही कोलकाता येथे हॉटेलमध्ये ‘रूममेट’ होतो. त्याने मला काही करून दाखविण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे आदल्या दिवशी सांगितले होते. मी ते ध्यानात ठेवले. झहीरने युवा वेगवान गोलंदाजांनादेखील प्रोत्साहन दिल्याने तो खऱ्या अर्थाने ‘टीम मॅन’ ठरतो.’’
खेळाबद्दल खोलात जाऊन मंथन करीत असल्याने झहीर हा भविष्यात उत्कृष्ट गोलंदाजी कोच सिद्ध होऊ शकतो. वेगवान गोलंदाजांच्या विकासात त्याचे योगदान मोलाचे असेल, असे लक्ष्मणने सांगितले.
>>नवी दिल्ली : सचिनसह कर्णधार धोनी आणि सुरेश रैना यांनी झहीरला पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन टिष्ट्वटवर लिहितो, ‘झहीर समजूतदारपणे चेंडू टाकायचा. फलंदाज अनेकदा बुचकळ्यात पडायचे. आव्हान पेलण्यास नेहमी सज्ज असायचा. मी त्याच्या सुखद भविष्याची कामना करतो.’
>>धोनीने झहीरला ‘प्रेरणादायी सहकारी’ संबोधले. तो म्हणाला, ‘‘जॉक मी तुझ्याहून चतुर गोलंदाज टीम इंडियात बघितलेला नाही. यापुढे भारतीय क्रिकेटला योगदान देण्यासाठी तुला शुभेच्छा!’’
>>बीसीसीआयचे अध्यक्ष अॅड. शशांक मनोहर म्हणाले, ‘‘झहीरने समर्पित भावनेने भारतीय क्रिकेटला सेवा दिली. भारतीय उपखंडात वेगवान गोलंदाज तयार होणे सोपे नाही; पण झहीरने वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करून संघाला अनेकदा विजय मिळवून दिला. मी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’’
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट विश्वात झहीरला यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून नेहमी स्मरणात ठेवले जाईल. रिव्हर्स स्विंग हे त्याचे प्रमुख शस्त्र होते. झहीर हा मैदान व मैदानाबाहेर सहकाऱ्यांसाठी तसेच इतर खेळाडूंसाठी ‘रोल मॉडेल’ आहे. गेल्या अनेक वर्षांत त्याने केलेली कामगिरी कधीही विसरू शकणार नाही.’’ अष्टपैलू सुरेश रैना म्हणाला, ‘‘झहीर ‘जेंटलमन’ आहे. माझ्यासाठी तर तो मोठा भाऊच! झहीर तुला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा!’’
>>झहीरमध्ये दिसला ‘शांत’;
पण आक्रमक गोलंदाज : सचिन
डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने गुरुवारी अनपेक्षितरीत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर दिग्गजांनी त्याच्या कारकिर्दीची प्रशंसा केली. दीर्घकाळ झहीरसोबत खेळलेल्या सचिनने तर, ‘झहीर हा भारतीय क्रिकेटमधील सर्वांत शांत, पण फलंदाजांना कोंडीत पकडणारा आक्रमक गोलंदाज होता,’ असे गौरवोद्गार काढले.