झांझरिया, सरदारसिंग यांची ‘खेलरत्न’साठी; तर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:25 AM2017-08-04T01:25:26+5:302017-08-04T01:25:28+5:30
दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांची सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दोन वेळेचा पॅरालिम्पिक सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांची सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस करण्यात आली आहे.
पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णविजेता असलेला पहिला भारतीय दिव्यांग खेळाडू झांझरिया याच्या नावाला न्या. सी. के. ठक्कर (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने प्रथम पसंती दिली.
समितीने दुसरा पर्याय म्हणून सरदारसिंगचे नाव निश्चित केले. या दोघांना संयुक्तपणे पुरस्कार देता येईल, असा सल्लादेखील समितीने दिला आहे. यावर अंतिम निर्णय क्रीडा मंत्रालय घेईल. सरदारसिंग हा भारतीय हॉकीचा सर्वांत यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्याच नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये ठसा उमटविला होता. राष्टÑकुल स्पर्धेतील रौप्यपदक आणि विश्व हॉकी लिग स्पर्धेतील कांस्यपदक भारताने सरदारसिंगच्याच नेतृत्वाखाली मिळवले होते. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर मात करीत रिओ आॅलिम्पिकचे तिकीटही सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली मिळविले. याआधी सरदारसिंग याला २०१५ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
निवड समितीने अर्जुन पुरस्कारांसाठी देखील १७ नावांची शिफारस केली आहे. त्यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा, महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, पॅरालिम्पिक पदक विजेता एम. थंगावेलू, वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया आणि हॉकी स्टार तसेच सरदारसिंगचा सहकारी एस. व्ही. सुनील यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
सरदारच्या निवडीवर वाद
सरदारच्या नावावर वाद झाला. भारतीय वंशाच्या एका ब्रिटिश महिलेने त्याच्यावर शारीरिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मैदानावरील त्याच्या कामगिरीबाबत कुणातही दुमत नव्हते.
समस्यांचा खेळावर प्रभाव नाही : सरदारसिंग
खासगी समस्यांचा खेळावर कधीही परिणाम होऊ दिला नाही, शिवाय खेळावरील लक्ष विचलित झाले नाही, असे राजीव गांधी ‘खेलरत्न’या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेला हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग याने सांगितले.
पाकिस्तानविरुद्ध २००६ मध्ये सिनियर हॉकी संघात पदार्पण करणारा सरदार म्हणाला, ‘खेलरत्न’ची शिफारस ही माझ्यासाठी सुखद वार्ता आहे. १५-१६ वर्षांपासून खेळत आहे. हॉकी इंडियाने माझ्या नावाची शिफारस केली असून पुरस्कार मिळेल, अशी आशा आहे. माझ्या कामगिरीचे श्रेय संघातील सर्व सहकाºयांना जाते. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते.’
मागच्या वर्षी सरदारच्या आयुष्यात अनेक खासगी चढ-उतार आले. त्यावर हा अनुभवी सेंटर हाफ म्हणाला, ‘माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न झाला. काय होत आहे याबद्दल मी आश्चर्यचकित होतो. माझा ‘फोकस’ मात्र हॉकीवर होता. हॉकी ही माझी ओळख असल्याने खेळाद्वारेच मी प्रत्युत्तर देऊ इच्छित होतो. काही लक्ष्य आखले असून, ते गाठण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे.’
आठ वर्षे भारतीय हॉकीचे नेतृत्व करणारा सरदार पुढे म्हणाला, ‘पुढील वर्षी आमची परीक्षा असेल. आशियाड, राष्टÑकुल क्रीडा स्पर्धा आणि भारतात होणारा विश्वचषक अशा मोठ्या स्पर्धांचे आयोजन होणार आहे.
आशियाडचे सुवर्ण जिंकून आम्ही आॅलिम्पिकची पात्रता गाठली होती. पुढेही हेच लक्ष्य असेल.’
रिओ आॅलिम्पिकच्या आधी सरदारकडून कर्णधारपद काढून गोलकीपर पी. आर. श्रीजेशकडे देण्यात आले होते. पण त्यामुळे मनोबल ढासळले नव्हते, असे सरदारने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नेतृत्व नसल्याने संघातील भूमिकेत बदल झाला असे मुळीच नाही. सिनियर्सचे काम युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणे हे आहे. युवा खेळाडूंना दडपण झुगारण्याची कला शिकवीत आहे. श्रीजेश असो की सध्याचा कर्णधार मनप्रीत या दोघांच्याही नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी केली.’
जून महिन्यात लंडनमध्ये झालेल्या विश्व हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत भारत सहाव्या स्थानावर घसरला. या स्पर्धेत कॅनडा आणि मलेशियाने भारताला हरविले होते. पराभवानंतरही भारतीय हॉकी संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा करीत सरदार म्हणाला, ‘कॅनडा व मलेशियाकडून पराभूत होऊ असे ध्यानीमनी नव्हते. पण विश्व हॉकीत असे निकाल येतात. अझलन शाह चषकात जपानने आॅस्ट्रेलियाला धूळ चारली. या चुकांमधून बोध घेत आम्ही पुढील स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करू.’
झांझरियाने २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिक आणि मागच्या वर्षीच्या रिओ आॅलिम्पिकमध्ये एफ ४६ गटात सुवर्णपदके जिंकली. त्याने दोन्हीवेळा विश्वविक्रम नोंदविला. २०१३ च्या विश्व चॅम्पियनशिपचा देखील तो सुवर्णविजेता आहे.
पुजाराने मागच्या सत्रात देशासाठी १३५०च्या वर धावा केल्या. मणियप्पनने पुरुषांच्या उंच उडीत (एफ ४६) सुवर्णपदक जिंकले, तर भाटीने याच गटात रौप्यपदक जिंकले होते. गोल्फर चौरसियाने २०१६ आणि २०१७ मध्ये इंडियन ओपनचा किताब जिंकला.
खेलरत्नसाठी शिफारस झालेले खेळाडू : देवेंद्र झांझरिया(पॅराअॅथलिट), सरदारसिंग(हॉकी).
अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झालेले खेळाडू : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी, खुशबीर कौर (अॅथलेटिक्स), आरोकिन राजीव (अॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), एल. देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओयनाम बेमबेम (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी ), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश ( नेमबाजी), ए. अंमलराज (टेबल टेनिस), साकेत मायनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियाना (कुस्ती), मणियन थंगावेलू (पॅरा अॅथलिट) आणि वरुण भाटी (पॅरा अॅथलिट).