ज्वेरेव्ह सलामीलाच गारद
By admin | Published: May 31, 2017 12:41 AM2017-05-31T00:41:35+5:302017-05-31T00:41:35+5:30
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा नववा मानांकित जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्हला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत
पॅरिस : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा नववा मानांकित जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्हला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेतरी स्पेनच्या फर्नांडो वर्डास्कोकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे माजी विजेता आणि तिसरा मानांकित स्टेन वावरिंका आणि जागतिक क्रमवारीत नंबर एक असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेने आंद्रे कुज्नेत्सोव्हाचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
वावरिंकाने पहिल्या सामन्यात स्लोव्हाकियाचा नवखा खेळाडू जोसेफ कोवालिक याच्यावर ६-२, ७-६, ६-३ ने विजय नोंदविला. २०१५ चा विजेता असलेल्या वावरिंकाची पुढील लढत युक्रेनचा अलेक्झांडर दोगलोपोलोव याच्याविरुद्ध होईल. दोगलोपोलोवने अर्जेंटिंनाचा कार्लोस बरलोक याच्यावर ७-५, ६-३, ६-४ ने विजय साजरा केला. मरेने दुसरा सेट गमावल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रशियाच्या आंद्रेचा ६-४, ४-६, ६-२, ६-० असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला़
ज्वेरेव्हला यंदा फ्रेंच ओपनचा प्रबळ दावेदार समजले जात होते, पण पहिल्याच सामन्यात स्पेनचा अनुभवी खेळाडू फर्नांडो वर्डास्को याने त्याला ६-४, ३-६, ६-४, ६-२ ने धूळ चारली. हा सामना सोमवारी रात्री अर्धवट राहिला होता. आॅस्ट्रेलियाचा १८ वा मानांकित निक किर्गियोस हा देखील दुसरी फेरी गाठण्यात यश्स्वी ठरला. त्याने जर्मनीचा फिलो कोलश्रायबर याचा ६-३, ७-६, ६-३ ने पराभव केला. अर्जेंटिनाचा २९ वा मानांकित ज्युआन मार्टिन डेल पेट्रोयाने आपलाच सहकारी गुड्डो पेला याच्यावर सहजरीत्या ६-२, ६-१, ६-४ ने विजय नोंदविला. अमेरिकेचा २७ वा मानांकित सॅम क्वेरी याला मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याला द. कोरियाचा हियोन चुंग याने ६-४, ३-६, ६-३, ६-३ ने धक्का दिला. महिला गटात ब्रिटनची सातवी मानांकित योहाना कोंटा पहिल्याच फेरीत पराभूत झाली. तायपेईची १०९ व्या स्थानावर असलेली सीह सु वी हिने १-६, ७-६, ६-४ अश फरकाने तिला नमविले. कोंटा तीनवेळा फ्रेंच ओपनच्या मुख्य फेरीत खेळली आहे. युक्रेनची पाचवी मानांकित इलिना स्वितोलिना हिने कझाखस्तानची श्वेदोव्हावर ६-४, ६-४ ने विजय साजरा केला. अमेरिकेची १२ वी मानांकित मेडिसन कीज, स्पेनची २१ वी मानांकित कार्ला सुआरेज आणि फ्रान्सची अलाईज कार्नेट यांनी देखील दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)