पहिल्या दिवशी झिम्बाब्वेचे वर्चस्व
By admin | Published: July 15, 2017 12:44 AM2017-07-15T00:44:49+5:302017-07-15T00:44:49+5:30
झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ३४४ धावांची मजल मारली.
कोलंबो : मधल्या फळीतील फलंदाज के्रग इर्विनच्या शानदार नाबाद शतकी खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात आज दिवसअखेर पहिल्या डावात ८ बाद ३४४ धावांची मजल मारली.
इर्विन १५१ धावा काढून खेळत असून ही त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी आहे. त्याने २३८ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व १ षटकार लगावला. इर्विनच्या खेळीमुळे झिम्बाब्वेने आपल्या कसोटी क्रिकेट इतिहासात एका दिवसातील सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम नोंदविला.
यापूर्वी वन-डे मालिकेत ३-२ ने विजय मिळवणाऱ्या झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या आघाडीच्या फळीला विशेष छाप सोडता आली नाही. एकवेळ त्यांची ३ बाद ३८ अशी अवस्था झाली होती. इर्विनने जबाबदारी स्वीकारताना एका टोकाकडून गडी बाद होणार नाही याची खबरदारी घेतली.
इर्विनने शतकी खेळीदरम्यान सिकंदर रजासोबत (३६) पाचव्या विकेटसाठी ८४ तर मॅलकम वॉलेरसोबत (३६) सताव्या विकेटसाठी ६५ धावांची उपयुक्त भागीदारी केल्या. दिवसअखेर इर्विनला डोनाल्ट टिरिपानो (नाबाद २४) याची चांगली साथ लाभली. या दोघांनी आतापर्यंत नवव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली आहे.
श्रीलंकेला सकाळच्या सत्रात डावखुरा फिरकीपटू रंगना हेराथने यश मिळवून दिले, पण त्यानंतरच्या सत्रात मात्र त्यालाही अपेक्षित यश मिळाले नाही. हेराथने १०६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. असेला गुणरत्नेने २८ धावांत दोन तर दिलरुवान परेरा व लाहिरू कुमारा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.