झिम्बाब्वेचे यश शानदार : आश्विन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:13 AM2017-07-18T03:13:54+5:302017-07-18T03:13:54+5:30
‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘झिम्बाब्वेने श्रीलंकेमध्ये जिंकलेली एकदिवसीय मालिका शानदार यश आहे. अशा अनपेक्षित निकालांमुळे क्रिकेटमध्ये कडवी स्पर्धा कायम राखण्यास मदत मिळेल,’ असे वक्तव्य भारताचा अव्वल आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने केले.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान आश्विनने आपले मत मांडले. आश्विनने सांगितले की, ‘झिम्बाब्वेचा श्रीलंकेविरुध्दच्या विजयाबद्दल सांगायचे झाल्यास, खेळ अशाच प्रकारे चालतो. कोणीही हरु शकतो आणि कोणीही जिंकू शकतो.
उद्या अफगाणिस्तानही बलाढ्य संघाला धक्का देऊ शकतो. अशा प्रकारेच खेळ पुढे गेला पाहिजे. खेळातील कडव्या स्पर्धेसाठी हे आवश्यक आहे.’ श्रीलंकेविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची
मालिका झिम्बाब्वेने ३-२ अशी
जिंकून क्रिकेटविश्वात खळबळ उडवली होती.
आगामी २१ जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होत असून या दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एकमेव टी२० सामन्याची मालिका खेळेल. दरम्यान, या दौऱ्यात सुरुवातीला दोनदिवसीय सराव सामनाही खेळविण्यात येणार आहे.
दरम्यान, यावेळी आश्विनने नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निवडीवर प्रतिक्रीया देण्यास टाळले. ‘माझ्या मते नवे प्रशिक्षक, नवे सहयोगी स्टाफ माझ्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने यावर बोलणे उचित नाही,’ असे आश्विनने यावेळी म्हटले.