झिम्बाब्वेचा दुसरा विजय

By admin | Published: March 11, 2016 03:45 AM2016-03-11T03:45:08+5:302016-03-11T03:45:08+5:30

विजयाच्या निर्धारासह उतरलेल्या स्कॉटलंड संघाने विश्वचषक टी-२० पात्रता सामन्यात गुरुवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये झिम्बाब्वेला अखेरपर्यंत झुंजविले;

Zimbabwe's second win | झिम्बाब्वेचा दुसरा विजय

झिम्बाब्वेचा दुसरा विजय

Next

किशोर बागडे , नागपूर
विजयाच्या निर्धारासह उतरलेल्या स्कॉटलंड संघाने विश्वचषक टी-२० पात्रता सामन्यात गुरुवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये झिम्बाब्वेला अखेरपर्यंत झुंजविले; पण अनुभव कमी पडल्याने सलग दुसरी लढतही त्यांना ११ धावांनी गमवावी लागली. लागोपाठ दोन पराभवांसह हा संघ पात्रता फेरीबाहेर पडला आहे.
झिम्बाब्वेला ७ बाद १४७ धावांवर रोखणाऱ्या स्कॉटलंडने नियमित फरकाने गडी गमावल्याने त्यांना संपूर्ण षटके खेळता आली नाहीत. दोन चेंडू आधीच त्यांचा डाव १३६ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेचा डावखुरा फिरकीपटू वेलिंग्टन मस्कद्जाने २८ धावांत ४ गडी बाद करून स्कॉटलंडला रोखले. चतारा आणि तिरिपानो यांनी प्रत्येकी २ तसेच सीन विल्यम्स व पेनियांगारा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. वेलिंग्टन मस्कद्जा ‘सामनावीर’ ठरला.
स्कॉटलंडसाठी रिची बॅरिंग्टन याने ३९ चेंडूंत एक चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. कर्णधार प्रेस्टन मोमसेन याने २७ चेंडूंत दोन चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ३९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी करून चुरस निर्माण केली होती. अखेरच्या २ षटकांत विजयासाठी २४ धावांची गरज असताना फलंदाजांचा अनुभव कमी पडला. जोश डेव्हीने १३ चेंडूंत एक चौकार व दोन षटकारांसह २४ धावा केल्या; पण संघाचा पराभव टाळण्यात तोदेखील अपयशी ठरला.
त्याआधी, सीन विल्यम्सच्या अर्धशतकामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या झिम्बाब्वेने ७ गड्यांच्या मोबदल्यात १४७पर्यंत मजल मारली. सीनने ३६ चेंडूंत ६ चौकारांसह सर्वाधिक ५३ धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडचा शिस्तबद्ध मारा आणि त्याला साजेशा क्षेत्ररक्षणामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजांना स्वैर फटकेबाजी करणे कठीण होऊन बसले होते. मायकेल सिस्क या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाकडून गोलंदाजीची सुरुवात करणाऱ्या स्कॉटलंडने झिम्बाब्वेच्या सलामीवीरांना बांधून ठेवले होते. चौथ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर जलद धाव घेण्याच्या नादात कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा (१२) धावबाद झाला. पहिल्या सामन्यात ५९ धावा ठोकणारा वुसी सिबांडा ४ धावा काढून परतला. एल्टन चिगम्बुराने १७ चेंडूूंत २० आणि मुतुम्बामीने १७ चेंडूंत १९ धावांचे योगदान देऊन धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. वॉलरने १३ धावा केल्या, तर १३ अवांतर धावांच्या मदतीने झिम्बाब्वेला आव्हानात्गक धावासंख्या उभारता आली. स्कॉटलंडकडून अ‍ॅलेसडेअर इव्हान्स, मार्क वॅट आणि सफियान शरीफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मायकेल लिस्क महागडा ठरला. त्याने चार षटकांत ३६ धावा मोजल्या.खेळाडूंची टक्कर!
झिम्बाब्वेचे सलामीवीर वुसी सिबांडा आणि कर्णधार हॅमिल्टन मस्कद्जा यांच्यात जोरदार धडक झाली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही फलंदाज एकाच दिशेने धावल्यामुळे एकमेकांवर धडकले. दोघांच्याही हातातील बॅट मैदानावर पडल्या होत्या. झिम्बाब्वेच्या डावात चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कव्हर पॉइंटवर हा आगळावेगळा प्रसंग घडला. यात मस्कद्जा धावबादही झाला, तर सिबांडाच्या हनुवटीवर जखम झाल्याने, सात मिनिटे खेळ थांबला होता. सिबांडाच्या हनुवटीवर चार टाके पडले असून, आता तो बरा असल्याची माहिती झिम्बाब्वेच्या मीडिया मॅनेजरने सामन्यानंतर पत्रकारांना दिली.
> आजचे सामने
नेदरलँड ओमान
दुपारी ३ वाजेपासून
बांगलादेश आयर्लंड
सायं. ७.३० वाजेपासून
> विश्वचषकात शांताबाई...
टी-२० विश्वचषकाच्या गुरुवारच्या सामन्यात व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये ‘शांताबाई... शांताबाई...’ या लोकप्रिय मराठी गीताची धून वाजविण्यात आली. पाठोपाठ ‘माझा नवीन पोपट हा लागला मिठूमिठू बोलायला’ हे आणखी हिट गाणे वाजविताच उपस्थित आबालवृद्धांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. युवक आणि युवती, शाळकरी मुले जोरदार नृत्य करीत असताना ज्यांना हे गाणे कळत नव्हते त्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अनेकांनी या गाण्यांबद्दल जाणून घेतले. आदिवासी विद्यार्थी आणि मूकबधिर विद्यार्थ्यांना एका संस्थेने सामन्याचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. मोठ्या संख्येने आलेले हे विद्यार्थी व त्यांचे शिक्षकही या गाण्यावर थिरकले.
>स्कॉटलंडच्या नागरिकांना
उन्हाचे चटके
स्कॉटलंडचे चाहते आपल्या संघाला पाठिंबा दर्शविण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांना उन्हाचे चटके सोसावे लागले. नागपूरचा उन्हाळा आणि उकाडा या दोन्ही बाबींचा अनुभव त्यांनाआला. मैदानात क्षेत्ररक्षण करणाऱ्या स्कॉटिश खेळाडूंना सावलीचा आधार घ्यावासा वाटला, तर प्रेक्षा गॅलरीतील त्यांच्या पाठीराख्यांना घाम पुसून- पुसून कंटाळा आला. आधीच गोरेपान असलेले हे चाहते नागपूरच्या उन्हात लालबुंद झाले होते.
> संक्षिप्त धावफलकस्कॉटलंड : १९.४ षटकांत सर्व बाद १३६
धावा (बॅरिंग्टन ३६, मोमसेन ३१, जोस डेव्ही
२४ वेलिंग्टन मस्कद्जा २८/४, चतारा २४/२, तिरिपानो २०/२).झिम्बाब्वे : २० षटकांत ७ बाद १४७ धावा
(सीन विल्यम्स ५३, एल्टन चिगम्बुरा २०, रिचमंड
मुतुम्बामी १९, माल्कम वॉलर १३, हॅमिल्टन मस्कद्जा १२; इव्हान्स ३०/२, वॅट ३१/२, शरीफ ३१/२).

Web Title: Zimbabwe's second win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.