‘डे’धडक सेलिब्रेशनचे १0 ट्रेण्ड्स

By admin | Published: January 15, 2015 06:34 PM2015-01-15T18:34:34+5:302015-01-15T18:34:34+5:30

कॉलेजमधला सगळ्यात ‘रोमॅण्टिक’ काळ म्हणजे डेज्. हे डेज् जो मनापासून जगला त्याचं कॉलेजलाइफ खरं श्रीमंत. यारीदोस्ती-प्यारव्यारसह मनसोक्त जगण्याची संधी म्हणजे हे सेलिब्रेशन. सध्या सर्वत्रच हे डेज् साजरे होत आहेत. पण त्या डेज्मधेही कुठले नवीन ट्रेण्ड आहेत? काय खास बात आहे? त्याचीच ही एक खास ट्रेण्डी चर्चा..

10 Day of Celebration Celebration | ‘डे’धडक सेलिब्रेशनचे १0 ट्रेण्ड्स

‘डे’धडक सेलिब्रेशनचे १0 ट्रेण्ड्स

Next
>पेण्ट युवर सारी.
 
‘साडी डे’ (बाय द वे, म्हणतात सगळ्याजणी ‘सारी डे.’) तसा टिपीकलच! पण कॉलेजातला सारी डे सगळ्यांसाठी स्पेशल असतो. आणि सध्या तर काय ‘साडी’ला देसी गर्लचं ग्लॅमर आलंय. त्यामुळे ते ग्लॅमर स्वत:साठी एनकॅश करण्याचा प्रयत्न अनेकजणी करताना दिसतात. ‘ए तू कुठली साडी नेसणार आहेस?’ या प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा थेट ग्रुप डिस्कशनचाच भाग होता. आणि मुलीच नाही, तर ग्रुपमधले मुलंही सजेस्ट करतात की, ‘व्हाय डोण्ट यू ट्राय समथिंग साऊथ इंडियन, जरीकाठ टाइप्स.’ ती आयडिया सगळ्यांना क्लिक झाली तर ठीक, नाही तर नाकं मुरडत सांगितलं जातं, ‘वी नीड समथिंग सोबर.’.
मग ते ‘सोबर’ शोधत बरेच ग्रुप कॉटनच्या नंदिता दास टाइप्स साड्यांना पसंती देतात. पण तरीही हिट आहेत या शिफॉनच्या वेगवेगळ्या रंगातल्या साड्या. सगळ्याजणी सरसकट शिफॉन. काहीजणी मात्र ‘अतीच डिझायनर’ एकदम झागरमागरही नेसतात.
मात्र यंदा शोधलंच की सबसे हटके काय आहे तर दिसतं ते स्वत: पेण्ट केलेल्या, कलाकुसर केलेल्या साड्या! प्लेन कॉटन किंवा शिफॉनच्या साडीवर आपल्याला हवं ते कलाकुसर अनेकजणी करवून घेतात. कुणीकुणी तर पेण्ट करवून घेतात. आणि काहीजणी तर स्वत:च बसतात स्पेशल कलाकुसर करायला! 
यंदा कॅम्पसमध्ये या स्वत:च स्वत:साठी डिझाईन केलेल्या साड्या एकदम हटके दिसताहेत.
 
 
रेट्रोवाले बॉबी 
आणि डिब्बे
कॉलेजमध्ये एक नवा डे सध्या सगळ्यांचा जाम फेव्हरेट झालेला आहे. त्याचं नाव ‘रेट्रो डे’.  सत्तर-ऐंशीच्या दशकातले तमाम हिरो-हिरोईन्स, त्याकाळच्या फॅशन्स आणि त्यातला वेगळेपणा जगून पाहायचा म्हणून हा रेट्रो डे. सगळ्यांची बॉबीवाली डिंपल, डिब्बा ऋषी कपूर, झिनत अमान, बेलबॉटमवाला अमिताभ असं भन्नाट रूप घेतलेलं दिसतं. ‘बॉबी’ प्रिंट्सच्या साड्या, स्कर्ट टॉप्स, लॉँग बेलबॉटम, त्यावर जॅकेट, तंग पंजाबी, केसांची डोक्यावर घरटी, हिल्स, असं काय काय घालून कॅम्पस तो काळच जगताना दिसतंय. सध्या कॅम्पसमध्ये सगळ्यात फेव्हरेट आहे तो हाच रेट्रो काळ! 
 
नो रोझ, नो चॉकलेट
चॉकलेट डे, रोझ डे हे प्रकरण आता जाम बोअर झालंय. ते गुलाबाच्या रंगाचे कोड लक्षात ठेवणं नको, ती रोझ क्विन नको नी ते कुढणंही नको. त्यामुळे अनेक मुलं आता नाहीच साजरे करता हे चॉकलेट नी रोझ डे! 
 
चपला नी माळा.
 आता एवढं स्टायलिंग करायचं तर चपला हव्याच ना तशा! काहीजण तर आपल्याला हव्या तशा चपला शोधत बाजारात फिरतात, काहीजण पैसे वाचवतात आणि थेट उधारउसनवारीवर, भाड्यानं चपला आणतात. काहींसाठी ट्रॅडिशनल चपला आणि सुंदर माळा ही सगळ्यात टेन्शनची गोष्ट झालेली दिसते.
 
टोटल पार्टी
 
‘डे’ साजरा तर केला. मग इतके सजून धजून काय लगेच घरी जायचे का?  कॉलेज संपल्यानंतर छानपैकी एखाद्या मॉलमध्ये जायचं किंवा सिनेमा बघायचा. हॉटेलमध्ये जाऊन पेटपूजा करायची, काहीतरी एक्झॉटिक प्लॅन करायचा हा नवा फंडा. त्यामुळे पार्टी झाल्याशिवाय डेचं सेलिब्रेशन पूर्णच होत नाही. रात्र सरते, पण अनेकदा पार्टी संपत नाही.
 
ट्रॅडिशनलला
ट्रेण्डी
तडका
 
साडी डे जसा तमाम कॉलेजात कॉमन असतो तसाच ट्रॅडिशनल डेही! मात्र अनेकांना वाटतं की, दरवर्षीच काय ते देशभरातले अनेकता में एकता दाखवणारे कपडे घालायचे. 
ट्रॅडिशनल को ट्रेण्डी तडका हे खरंतर यंदा तमाम कट्टय़ावरचं क्रिएटिव्ह डोकं आहे. त्यासाठीच  मग  घागर्‍यावर बॅकलेस चोली, स्लिव्हलेस चोली, थ्री-फोर्थ घागरा किंवा नियॉन कलरचे घागरे-चोली, डिझायनर ओढणी असा भन्नाट सेन्शुअस पेहराव अनेकजणी करतात. बर्‍याचजणी तर बॅकलेस चोलीवर खुलून दिसण्यासाठी टेम्पररी टॅटू किंवा मेंदी लावून घेतात.  
‘रामलीला’ सिनेमातले ट्रॅडिशनल पण फॅशनेबल दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग हे सगळ्यांचे यंदा ट्रॅडिशनल ट्रेण्डी आयकॉन आहेत. त्यांचा तो लूक यंदा सुपरहिट दिसतोय..
 
 
चिवित्रांची चर्चा
 ‘टाय डे’, ‘हॅट डे’, ‘प्रॉप्स डे’ हे आणखी एक चित्रविचित्र प्रकरण सध्या गाजतंय. सुपीक डोक्यांची क्रिएटिव्हिटी पाहायची तर या डेला कॅम्पसमध्ये जायला हवं. कुणी टी-शर्टवर टाय बांधून येतं, तर कुणी थ्री-फोर्थ बरमुडावर टाय बांधतं. वेगवेगळ्या रंगांच्या, आकाराच्या हॅट्स, मोठे चकमकीत चष्मे, छडी, वेगवेगळे संदेश लिहिलेले बोर्ड, त्यावरचे मनमर्जी संदेश, दुनियेला उपेदश असं काय काय त्या फलकांवर दिसतं.
 
रेनेसॉँ
 बर्‍याच कॉलेजमध्ये ‘रेनेसॉँ’ म्हणजे पुनरुज्जीवनाचा काळ पुन्हा नव्याने साजरा करण्यात येतो. जगाच्या इतिहासातच नाही, तर विविध भाषांचा अभ्यास करणार्‍यांनाही हा रेनेसॉँ भेटतोच. त्यामुळे मग तो काळच जगण्याची ही खास धडपड दिसते. बरेच जण दुसर्‍या दुनियेतील लोकांची वेशभूषा करतात. वॅम्पायरचा लूक  काळा गाऊन, काळी हॅट, चेहर्‍याला सफेद रंग, डोळे काळे, लाल ओठ असा भयानक अवतार काहीजण करतात, तर काही अजून काय काय डोकं लढवतात.
सगळ्यात चॅलेंज सध्या मुलांना याच डेचं वाटतं!
 
मुलेही पार्लरमध्ये!
 नट्टापट्टा तर काय मुली पूर्वीही करत. पण आता मुलीच नाही, तर मुलंही ‘सलून’मध्ये जाऊन तयार होतात. हेअरस्टाईल ते मेकअप, दंडावर टॅटू, नेल आर्ट, प्रॉपर स्टायलिंग हे सारं मुलं-मुली दोघांसाठीही प्रचंड महत्त्वाचं झालंय. त्यापायी घसघशीत पैसे खर्च करण्याचीही अनेकांची तयारी दिसते.
 
ग्रुपी
इतका नट्टापट्टा करून तयार होऊन कॉलेजमध्ये जायचे, मित्र-मैत्रिणींमध्ये भाव खायचा आणि फोटो तर काढायलाच हवा ना. आत्ताच्या ‘सेल्फी’ जमान्यात प्रत्येकाकडेच अँण्ड्रॉइड मोबाइल असल्यामुळे काढ फोटो टाक फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अशी पद्धत रूढ होत चालली आहे.  पण सगळ्यात भन्नाट क्रेझ आहे ती टोटल कुल, टोटल एक्सायटिंग ग्रुपी काढण्याची. आपापल्या ग्रुपचे असले भन्नाट फोटो काढले जातात की, ते काढणं हीच एक भारी गोष्ट असते. आणि मग तोच फोटो ग्रुपचा डीपी होतो.
 

Web Title: 10 Day of Celebration Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.