दिवसातून १५० वेळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 03:05 PM2018-05-10T15:05:44+5:302018-05-10T15:05:44+5:30
स्मार्टफोन तुम्ही कशासाठी वापरता? एका दिवसात म्हणजेच चोवीस तासात कितीवेळा हातात स्मार्टफोन घेता? कितीवेळा काही नवीन आलंय का हे तपासता?
-डॉ. मोहंमद नावेद खान
तरुणांचं मोबाइल अॅडिक्शन घातक आहे; त्यानं संवाद संपतो, नव्या सृजनशील कल्पनांची कुलपंच उघडत नाहीत. फॉरवर्डच्या ढकलगाडीत ‘हॅपनिंग’ जगात असल्याचा फील वाढतो. अलिगढ मुस्लीम विद्यापीठानं अलीकडेच केलेला अभ्यास या चर्चेवर शिक्कामोर्तब करत धोक्याची घंटा वाजवतोय. दुसरीकडे कोल्हापुरात काही महाविद्यालयीन तरुण
चक्क मोबाइल उपवास करताहेत. कसं जमतं ते त्यांना? .. एक शोध.
अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा अभ्यास म्हणतो, महाविद्यालयीन मुलं दिवसाला किमान ७ तास स्मार्टफोनला चिकटलेली असतात.
एका दिवसात तुम्ही मोबाइल कितीदा चेक करता?
- असं आम्ही विचारलं तर महाविद्यालयीन मुलं सांगतात, ‘ज्यादा नहीं, यहीं कुछ दस-बाराह बार! वैसे भी फॉरवर्ड बहौत बोअर करते है! कितना पकाते है लोग!’
- वरवर पाहता हे उत्तर समाधानकारकच वाटतं. म्हणजे कॉलेजात जाणाऱ्या मुलांना कळतं तर की, सतत मोबाइल चेक करण्यात काही अर्थ नाही. त्यातून काही मिळत नाही.
मात्र खोलात शिरलं, तरुण मुलांच्या ‘मोबाइल डिपेण्डन्सी’चा अभ्यास करायला घेतला की जे चित्र हाती येतं ते भयंकर आहे. मुळात ‘मोबाइल डिपेण्डन्सी’ हा शब्दच यापूर्वी आपल्या आयुष्यात नव्हता तो आता आपल्या आयुष्यात दाखल होऊन आपण त्यावर पूर्णत: अवलंबून झालो आहोत हेच लक्षात आलेलं नाही अशी आपली अवस्था आहे. त्या अवलंबित्वाची जाणीवही अनेकांना नाही. या स्मार्टफोन डिपेण्डन्सीचा तपशिलात अभ्यास, शास्त्रीय रितीनं संशोधन करायचं आम्ही ठरवलं. एकीकडे सरकार ‘डिजिटल’ होण्याचं धोरण स्वीकारत असताना तरुण मुलं आपला स्मार्टफोन नेमका कशासाठी वापरतात, त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे शोधायला हवं. तरच त्या धोरणांविषयी तरुण मुलांमध्ये किती जनजागृती आहे याचाही अंदाज येणं शक्य आहे. भारत सरकारने सध्या जे डिजिटल इंडिया धोरण स्वीकारलं आहे, त्या धोरणाला पूरक-पोषक वर्तन स्मार्टफोन यूजर्समध्ये दिसतं का? या अभ्यासातून त्या डिजिटल धोरणाच्या उत्तम अंमलबजावणीसाठी काही लाभ होऊ शकेल का, अशी एक प्राथमिक दिशा ठरवून आम्ही संशोधनाला सुरुवात केली. भारताच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचे नऊ आधारस्तंभ अर्थात ९ पिलर्स आहे. त्याअंतर्गत भारत सरकार नऊ विविध उपक्रम राबवते, ब्रॉडबॅण्ड हायवेज, ई-गर्व्हनन्स, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, युनिव्हर्सल फोन अॅक्सेस (म्हणजे इंटरनेट वापरून जगात कुठंही फोन करता येणं.) ई-क्रांती, रोजगारासाठी आयटी अर्थात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सार्वजनिक इंटरनेट अॅक्सेस उपक्रम, सर्वांसाठी माहिती उपलब्ध होणं अर्थात इन्फॉर्मेशन फॉर आॅल, अर्ली हार्वेस्ट प्रोग्रॅम-शेतीसाठी पूरक-पोषक उपक्रम हे सारे डिजिटल धोरणाचा भाग आहे. या साºया उपक्रमांत शहरांपासून गावपातळीवरच्या तरुण मुलांचा समावेश होणं, त्यांनी या डिजिटल गोष्टींचा लाभ घेणं अपेक्षित आहे.
मात्र तसं व्हायचं असेल तर महाविद्यालयीन तरुणांच्या स्मार्टफोन वापरण्याच्या सवयी, त्या वापरातून त्यांना मिळणारा आनंद ( ज्याला हेडोनिझम म्हणतात, एक गोष्ट वारंवार वापरल्यानं त्यातून मिळणारा, वाढत जाणारा आनंद), स्मार्टफोन वापरण्याची सामाजिक गरज, समाजाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष होणारा परिणाम, सोय, अवलंबित्व, आॅनलाइन क्रयशक्ती आणि वर्तन या साºयाचा अभ्यास करणं गरजेचं होतं.
तोच अभ्यास आम्ही करायचं ठरवलं आणि दोन वर्षांच्या अभ्यासातून हाती आलेली माहिती आश्चर्यचकित करणारी आणि तितकीच धास्तावणारीही होती.
त्यातला सगळ्यात मोठा धक्का होता तो म्हणजे ही मुलं स्मार्टफोन कशासाठी वापरतात?
मुख्यत्त्वे लोक फोन कशासाठी वापरतात?
याप्रश्नाचं सामान्य उत्तरं असं की कॉल करण्यासाठी, दूर असलेल्या माणसाशी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी, माहिती देण्यासाठी किंवा संपर्कात राहण्यासाठी फोन वापरला जातो. म्हणजे ‘कॉल करण्यासाठी’ या फोनचा प्रत्यक्षात, फंक्शनल वापर करणं अपेक्षित आहे. किंवा तोच फोनचा वापर इतकी वर्षे केला गेला.
मात्र हे झालं भूतकाळाचं वर्णन.
महाविद्यालयात, विद्यापीठात शिकणारी आजची तरुण मुलं स्मार्टफोनचा वापर नॉन फंक्शनल कारणांसाठीच अधिक करतात. नॉन फंक्शनल म्हणजे नॉन कॉलिंग. म्हणजे फोनचा वापर बोलण्यासाठी, कॉल करण्यासाठी फार कमी प्रमाणात केला जातो. त्यापेक्षा फोनचा वापर अन्य कारणांसाठीच अधिक केला जातो. म्हणजेच सोशल नेटवर्किंग साइट्स पाहणं अगर वाचणं, विविध गोष्टी गूगलवर सर्च करणं आणि मनोरंजन अर्थात यूट्यूबवर विविध व्हिडीओ पाहणं यासाठीच स्मार्टफोनचा बहुतांश वापर केला जातो. या साºयाच्या तुलनेत प्रत्यक्ष बोलण्यासाठी फोनचा वापर कमी झालेला दिसतो.
हा अभ्यास आम्ही तुलनेनं लहान प्रमाणात आणि राजधानी दिल्लीच्या परिघातल्या मुला-मुलींचा केला असून, त्यात ५३ टक्के मुलं आणि ४७ टक्के मुली सहभागी झालेल्या आहेत. अर्थात स्मार्टफोन यूजर्सच्या वर्तनात लिंगभेदानुरुप काही वेगळ्या गोष्टी किंवा निष्कर्ष यात नोंदवलेले वा आढळलेले नाहीत.
या अभ्यासात आम्हाला अनेक धक्कादायक गोष्टी स्मार्टफोन वापर-वर्तनासंदर्भात आढळल्या आहेत.
आम्ही अभ्यासात ज्यांना भेटलो त्यातल्या फक्त २६ टक्केच मुलांना वाटतं की फोनचा प्राथमिक आणि खरा-फंक्शनल वापर हा ‘कॉलिंग’ अर्थात परस्परांशी बोलणं हा आहे. फोनचा प्राथमिक उपयोग काय या प्रश्नाचं उत्तरही बाकीच्यांनी वेगवेगळं दिलेलं आहे, शंभरात केवळ २६ मुलांनाच वाटतं की, फोन हा कॉलिंगसाठी असतो!
या अभ्यासात सहभागी झालेले फक्त ४ टक्के विद्यार्थी दिवसाला तीन तासांपेक्षा कमी वेळ फोन वापरतात. (३ तास हा वेळ कमी आहे का? -हा वेगळा प्रश्न!)
६३% मुलं दिवसाला ४ ते ७ तास स्मार्टफोन वापरतात. आणि २३ टक्के मुलं, तर दिवसाला कमीत कमी ८ तास फोन वापरतात.
आता सगळ्यात महत्त्वाचा आणि लेखाच्या सुरुवातीलाच विचारलेला प्रश्न, दिवसाला तुम्ही किती वेळा मोबाइल चेक करता? हातात घेता? त्यात काही नवीन दिसतंय का पाहता?
सरासरी- किमान १५० वेळा मुलं मोबाइल चेक करतात, तपासतात. हे प्रमाण किमान आहे, ज्यांना आपण मागे पडू, कोण काय म्हणतंय हे पहायची ‘अन्झायटी’ आहे त्यांचं प्रमाण अर्थातच यापेक्षा जास्त आहे!
ही आकडेवारी धास्तावणारी आहेच, इतका स्मार्टफोनचा वापर होतो तर मुलं फॉरवर्ड आणि चर्चा, मनोरंजन, यूट्यूब यापलीकडे या माध्यमाचा काय वापर करतात हा वेगळ्या अभ्यासाचा प्रश्न आहे. त्यात आपण मागे पडू याची भीती, आपल्याकडे लोकांचं लक्ष नसण्याची आणि सगळ्यात असण्याची अन्झायटीही सतत स्मार्टफोनला चिकटून रहायला भाग पाडते असंही दिसतं. अति स्मार्टफोन वापराचे परिणाम त्यांच्या तब्येतीवर, डोळ्यांवर होतात. डोकेदुखी, अस्वस्थता, औदासीन्य त्यांना जाणवतं आणि अभ्यासावर परिणाम होतं असंही यात वरकरणी आढळून आलं.
स्मार्टफोनचा वापर आपण किती वेळ आणि कशासाठी, करतो हे प्रत्येकानं तपासून पहायला हवं. त्याचा विधायक उपयोग होतो का, नव्या ई-क्रांतीचा आपण भाग आहोत हे ही तपासायला हवं.
त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न, तुम्ही दिवसातून कितीदा आपला मोबाइल चेक करता..?
- १५० वेळा, की त्याहून अधिक...?
सहयोगी प्राध्यापक, मॅनेजमेण्ट स्टडीज अॅण्ड रिसर्च,
अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, अलिगढ mohdnavedkhan@gmail.com