1984, कल्पनेतील गोष्ट आयुष्यात जगतो तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:42 AM2018-03-15T08:42:48+5:302018-03-15T08:42:48+5:30
एकेकाळी जे फक्त कल्पनेत होतं, ते आयुष्य आपण जगतो तेव्हा..
1984 असं म्हणतात की काही गोष्टी ज्या निष्णात अभ्यासकाला किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञाला कळत नाहीत, त्या एका सर्जनशील लेखकाला पटकन जाणवू शकतात. असंच काहीसं जॉर्ज ऑरवेल यांच्या १९८४ या कादंबरीबद्दल म्हणता येईल. १९८४ साली लिहिलेल्या या कादंबरीमध्ये एका अशा परिस्थितीचं वर्णन केलं आहे, जिथे एक देश कायम कोणत्या ना कोणत्या युद्धाला सामोरं जात आहे. या देशात माणसाला कोणतंही स्वातंत्र्य नाही, सदा सर्वकाळ त्यांच्यावर एक ‘बिग ब्रदर’ पाळत ठेवून आहे. इथे राजकीय सत्ता ही फक्त आणि फक्त स्वत:चा विचार करते, माणसांना कोणत्याही प्रकारचं विचार स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाहीये.
आज हे पुस्तक, या पुस्तकामध्ये घडणाºया गोष्टी, त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान हे सारं चक्क आज आपल्या अवतीभोवती आहे. ते आपण सर्रास वापरात असतो. ते वापरताना, आपल्याला आपलं स्वातंत्र्य, आपले विचार, त्यांच्यावर सरकारचा होणारा परिणाम याचा कोणताही विचार करत नसतो. नेमकं हेच चित्र जॉर्ज ऑरवेल यांनी या कादंबरीत रेखाटलं आहे.
‘ओशिनया’ या काल्पनिक देशात राहणारे लोक, त्यांची स्वमग्नता, दुसºयांचा अजिबात विचार न करण्याची सवय, लोकांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांच्या मागे धावत गेलेलं अख्खं आयुष्य.. असं अतिशय निराशावादी वाटणारं चित्र आॅरवेल रंगवतो. वाचताना पुस्तकातल्या पात्रांबद्दल कमालीचं वाईट वाटायला लागत. पात्रांबद्दल राग येतो. पण हळूहळू आपल्याला पटायला लागतं की आपण जरा त्यांच्या सारखेच आहोत की!
या पुस्तकात वापरलेली भाषा आज आपल्याला अनेक वेळा वापरली गेलेली दिसून येते. विशेषत: शब्द जसे, बिग ब्रदर, न्यूजिस्पक, थॉटक्राइम इत्यादी.
जॉर्ज ऑरवेलच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकाचं अनेक ठिकाणी रूपांतरण झालं आहे. लोकांनी भाषांतरे तर केलीच, पण अनेक चित्रपट, नाटकं, पुस्तकं या पुस्तकातल्या मूळ कल्पनेवर आधारलेली आहेत.
यावर आधारलेला चित्रपट १९८४ हा यूट्यूबवरही तुम्हाला पाहता येईल. १९५६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुस्तकात मांडलेल्या कल्पनांना चांगला न्याय देतो.
ऑरवेल यांची इतर ‘राजकीय’ पुस्तकं जसं अॅनिमल फार्म किंवा होमेज टू कॅटालोनिया ही पुस्तकंही जरूर वाचा!