नात्यांकडे संशयाने पाहू नकोस. प्रेमावर विश्वास ठेवच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:55 AM2020-01-09T07:55:55+5:302020-01-09T08:00:15+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक
- मृणाल कुलकर्णी
मृणाल, सांगू तुला, वयाच्या विशीत तू घेतलेले 90 टक्के निर्णय योग्यच होते. उरलेले 10 टक्के चुकले तर त्याची खंत करणं सोडून दे. त्या वयात तू घर, करिअर आणि स्वतर्च्या आवडीनिवडी हे सगळं बॅलन्स करू शकलीस, ते भल्याभल्यांना जमत नाही अगं!
तू ते केलंस त्याबद्दल आनंदी राहा. आणखी काय काय जमलं असतं ही खंत मनात येऊ देऊ नकोस.
अजून एक, याच वयात ठरव तुझा लाइफ पार्टनर. अनेक निर्णय दोघांनी मिळून घेतले, साथ दिली एकमेकांना तर एक उत्तम आयुष्य जगता येतं, यावर माझा आजही शंभर टक्के विश्वास आहे.
एकच बदल कर जमलं तर स्वतर्त, दुसर्याला वाईट वाटेल म्हणून स्वतर्ला त्रास करून घेऊ नकोस. इतरांच्या हातातलं आईस्क्रीम वितळू नये, ते त्यांना खाता यावं हे पाहताना आपल्या हातातलं आईस्क्रीम गळून जात नाही ना, हे पण पाहा!
आयुष्यात योग्य वयात योग्य निर्णय घेतले तर त्याचे फायदेच होतात. त्यामुळे रिस्क घ्यायला घाबरू नकोस. मला माहितीये, तुझ्या वयाच्या अनेक मुली म्हणतात की, नको लग्न, त्यानं माझ्या स्वातंत्र्यावर गदा येईल; पण मला तसं वाटत नाही. बायका स्मार्ट असतात अगं. आणि आता तर काळ किती बदलला. पार्टनर आता एकमेकांच्या साथीनं पुढे जातात. आणि आपला पार्टनर तसं काही कमी करत असेल तर त्यानं ते करावं म्हणून तसे संस्कारही जरा धीर धरून करायला लागतात.
खरं सांगते, एक स्री म्हणून आपल्याला सगळं हवं असतं. स्रीत्वाचं एक अंग जर पूर्ण नाही झालं तर पुढं कुठं तरी वाईट वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे घे बिनधास्त निर्णय.
मुख्य म्हणजे नात्यांकडे प्रेमाने बघ, संशयाने पाहू नकोस. शंका कुणालाच जिंकून घेऊ शकत नाही, प्रेम मात्र सर्वाना जिंकतं. त्यामुळे प्रेमावर विश्वास ठेवच.
अजून एक म्हणजे, तब्येत सांभाळ!
ते अत्यंत आवश्यक आहे. हे राहिलं, तेही करून घेऊ, तेही करता येईल असं म्हणताना फिटनेसचा हात सुटतो. तो सोडू नकोस. फिटनेसबाबात जागरुक राहा. फिजिकली आपण फीट नसलो तर आपली अनेक स्वप्नं अपूर्णच राहू शकतात.
बाकी काय तुला उत्तम यश, उत्तम कुटुंब लाभलं आहे, त्यांची भक्कम साथ आहे.
यातून तर तू उभी आहेस, मी उभी आहे.
तू आणि मी एकच तर आहोत.
(ख्यातनाम अभिनेत्री)